सायबर बुलिंग – गुंडगिरीचा आधुनिक चेहरा

इंटरनेटचा वापर वाढला तशी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली हे तर आपण नेहमीच ऐकतो. विविध प्रकारचे सायबर गुन्हे आपल्याला माहीत आहेतच, अशात एक नवीन संज्ञा सध्या कानी पडत आहे ती म्हणजे सायबर बुलिंग. सायबर फ्रॉड, सायबर थेफ्ट, सायबर क्राइम अशा डिजिटल गुन्ह्यांच्या पंक्तीत बसणारे हे नाव नवीन आहे मात्र यात होणारे दुर्दैवी प्रकार मात्र प्रत्यक्ष आयुष्यात होणाऱ्या गुंडगिरीचे आधुनिक रूप आहे.

आपले आंतरजालावरचे आयुष्य ही आपल्या प्रत्यक्ष आयुष्याची एक प्रतिमा किंवा आपला आरसा म्हणता येईल. आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात होणाऱ्या अनेक घटना या थोड्या फार फरकाने तशाच ऑनलाइन सुद्धा घडतात. या घटना ऑनलाइन घडल्या तरी त्याचे पडसाद मात्र प्रत्यक्ष आयुष्यातच पडतात. जितक्या सहजतेने आपण ऑनलाइन वावर करू शकतो, तितक्याच सहजतेने गुन्हे सुद्धा घडतात. सायबर बुलिंग हा गुंडगिरीचा आधुनिक चेहरा आहे.

सायबर बुलिंग म्हणजे काय ?

सोप्या इंग्रजी शब्दांची फोड केली तर, बुलिंग म्हणजे गुंडगिरी, मवाली! जेव्हा गुंडगिरी ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे, इंटरनेट अथवा मोबाइल द्वारे केली जाते त्याला नाव दिले आहे सायबर बुलिंग. ऑनलाइन कुणाला त्रास देणे, छळणे, शिवीगाळ करणे, कंडया पिकवणे (ब्लॅकमेल) या प्रकारांना सायबर बुलिंग म्हणतात. एखाद्या व्यक्तिचा ऑनलाइन छळ करून त्याला त्रास देण्याचा हा नवीन प्रकार आहे त्यामुळेच त्याला गुंडगिरीचा आधुनिक चेहरा म्हणता येईल. भारतीय सायबर कायद्यांत सायबर बुलिंग या शब्दाची व्याख्या केलेली नाही मात्र सायबर बुलिंग मध्ये होणारे प्रकार इतर काही संज्ञा वापरुन कायद्याच्या चौकटीत बसतात.

सायबर गुंडगिरी हे आपल्या वास्तविक जगात होणाऱ्या गुंडगिरीपेक्षा थोडे वेगळे असते. सायबर बुलिंग ही डिजिटल फूटप्रिंट सोडते, म्हणजे पुरावे ठेवून जाते. या डिजिटल फूटप्रिंट्सचा (पुरव्यांचा) वापर करून आपण गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा स्त्रोत शोधू शकतो आणि गुंडगिरी थांबवू शकतो. सायबर बुलिंग मध्ये पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणारा योग्य पुरावा मिळवू शकतो.

सायबर बुलिंग कशी होते?

सायबर बुलिंग मुख्यतः सोशल मीडिया, वैयक्तिक संपर्क करण्याची साधने, गेमिंग समुदाय, फोरम, अशा वेबसाइट जिथे माहितीची देवाण घेवाण आणि एकमेकांशी चर्चा करता येतात अशा ठिकाणी होते. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर, काही लोक (हल्लेखोर) एखाद्या व्यक्तीबद्दल (पीडित) नकारात्मक पोस्ट, हानीकारक, खोटी सामग्री किंवा वैयक्तिक माहिती इत्यादि शेअर करतात. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे कारण ती व्यक्तीच्या (पीडित) संपूर्ण आयुष्यावर परिणाम करते.

ठरवून एखाद्या व्यक्तीबद्दल सतत वाईट, नकारात्मक पोस्ट लिहिणे. मुद्दाम एखाद्याचा अपमान करणे, किंवा एखादा अपमानकारक मजकूर पसरवणे असे काही नेहमीचे पण लक्षात न येणारे गुन्हे हे सायबर बुलिंग मध्ये मोडतात. एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याचा विषय जाहीरपणे मांडणे, वैयक्तिक विषय उघड करून बदनामी करणे हे काही गंभीर प्रकारांत मोडतात. अनेकदा ऑनलाइन ब्लॅकमेल करणे, धमकावणे असे थेट एखाद्याच्या जीवाशी खेळणारे प्रकार देखील केले जातात.

सामान्य वाटत असले तरी सायबर बुलिंगचे प्रकार अनेकदा गंभीर होतात. पीडित व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर परिमाण होतात. कदाचित लोक आत्महत्येला प्रवृत्त होतात. पीडित व्यक्ति अल्पवयीन असतील तर मुलांची वृत्ती, स्वभाव, वागणूक बदलून जाऊ शकते.

कोविड महाशयांचा उपकाराने बऱ्याच गोष्टी ऑनलाइन होऊ लागल्या, विशेषतः स्मार्टफोन वरून ऑनलाइन शिकवण्या सुरू झाल्या त्यामुळे लहान मुलांना या गुंडगिरीचा जास्त धोका निर्माण झाला आहे. मुले केवळ गेम खेळत आहेत असे वाटत असले तरी, गेमिंग ग्रुप, ऑनलाइन टीम आणि स्पर्धा याद्वारे नकळत सायबर बुलिंग घरात शिरकाव करू शकते. त्यामुळे लहान मुलांच्या स्मार्टफोन वापरण्यावर नियंत्रण आणि लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

सायबर बुलिंगचे प्रकार

इंटरनेटच्या युगात, असंख्य प्रकारची सामग्री असंख्य व्यक्तींद्वारे सामायिक किंवा पोस्ट केली जाते. वैयक्तिक सामग्री तसेच कोणतीही नकारात्मक, हीन दर्जाची सामग्री किंवा धोकादायक सामग्री इ . यांच्यामध्ये असलेली असलेली दृश्ये, त्यांचे क्रियाकलाप आणि त्यांचे वर्तन यांचा एक प्रकारचा कायमस्वरूपी रेकॉर्ड तयार करते. सायबर गुंडगिरीच्या स्वरूपावर आधारित, त्याचे विस्तृतपणे खालील संज्ञांमध्ये वर्गीकरण केले आहे:

  • कायमस्वरूपी सायबर बुलिंग: या प्रकारची सायबर गुंडगिरी ही कायमचे डिजिटल फूटप्रिंट सोडते. एखादी पोस्ट जी कधीही हटवली जात नाही अशा प्रकारची बुलिंग ही कायमस्वरूपी बुलिंग म्हणवल्या जाते. एखाद्या वाईट गोष्टीची तक्रार अथवा रिपोर्ट न दिल्यास ती कधीही हटविला जात नाही, त्यामुळे कायमचा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर राहतो. कायमस्वरूपी ती पोस्ट पीडित व्यक्तीला आयुष्यभर त्रास देऊ शकते ज्यामुळे त्याचे भविष्य तसेच वर्तमान प्रभावित होते.
  • सतत होणारी सायबर बुलिंग: एखाद्या व्यक्तीला नियमित रूपाने ऑनलाइन पाठलाग करून त्रास देणे, सतत धमकावणे असे प्रकार केले जातात त्याला ‘persistent’ किंवा सतत होणारी सायबर बुलिंग म्हणतात. एखाद्या व्यक्तिला दर थोड्या कालावधी नंतर त्रास देणे, अशा परिस्थितिमध्ये ती पीडित व्यक्ति होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करत नाही आणि गुंडगिरी पुनः होत राहते. असे प्रकार बहुतांश वेळा लहान मुलांसोबत होतात कारण लहान मुले त्यांना होत असलेला त्रास व्यक्त करत नाहीत. बऱ्याच प्रकरणांत पीडित व्यक्तींना आपल्याला होत असलेल्या त्रासाची जाणीव नसते व ते दुर्लक्ष करतात.
  • सायबर बुलिंग जी लक्षात येत नाही: सायबर गुंडगिरीचे असे काही प्रकार देखील होऊ शकतात जे कुणाच्याही लक्षात येत नाहीत. बरेचदा गोड गोड बोलण्याच्या नावाखाली मारले जाणारे टोमणे, गमतीच्या नावाखाली केलेली शेरेबाजी आपल्या लक्षात येत नाही आणि अशा गुन्ह्यात दुर्लक्ष होते.
  • सायबरस्टॉकिंग: यामध्ये पीडित व्यक्तीच्या ऑनलाइन गोष्टींवर निगराणी करणे, खोटे आरोप करणे, ऑफलाइन पाठलाग करणे, धमक्या देणे समाविष्ट आहे. हा सायबर बुलिंगचा गंभीर प्रकार मानला जातो. हे प्रकार वेळीच थांबले नाही तर पीडित व्यक्तिला शारीरिक धोका निर्माण होण्या पर्यन्त पुढे जाऊ शकते.
  • फसवणूक: पीडित व्यक्तिचा विश्वास संपादन करून नंतर त्याची फसवणूक करणे, बदनामी करणे असे प्रकार होतात जे सायबर बुलिंगच्या फसवणूक प्रकारात मोडतात. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातली माहिती इतरांना पुरवणे, त्या माहितीच्या दुरुपयोग करणे असे गुन्हे या प्रकारात मोडतात.
  • ट्रोलिंग: या प्रकारात गुंडगिरी करून पीडिते व्यक्तिला त्रास देण्यासाठी आक्षेपार्ह पोस्ट किंवा टिप्पण्या ऑनलाइन पोस्ट करतात. गुंडगिरीचे सामान्यतः पीडिते व्यक्तिशी कोणतेही वैयक्तिक संबंध नसतात परंतु पीडिते व्यक्तिला मानसिकरित्या हानी पोहोचवण्याचा त्यांचा हेतू असतो.

सायबर बुलिंगचे परिणाम

सायबर बुलिंग हा एक घृणास्पद गुन्हा आहे. सायबर बुलिंगने पीडित व्यक्तिच्या आयुष्यावर दीर्घ काल परिणाम होऊ शकतो. आपली कधीही या गोष्टींतून सुटका होणार नाही अशी मनस्थिति एखाद्या पीडित व्यक्तिची होऊ शकते. आपण जाऊ तिथे सायबर गुंड आपला पाठलाग करतील अशा भावना अनेक पीडितांना निर्माण होऊ शकतात.

सायबर बुलिंग खालील काही प्रकारे एखाद्या पीडिताच्या आयुष्यवार परिणाम करू शकतात:

  • मानसिकदृष्ट्या: सायबर बुलिंगचे बळी स्वतःच स्वतःबद्दल अस्वस्थ, राग आणि लज्जा अशा मानसिक अवस्थेत राहतो. पीडित व्यक्ती सतत भीती आणि चिंतेच्या अवस्थेत जगते ज्यामुळे नैराश्य, मूड बदलणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात.
  • भावनिकदृष्ट्या: सायबर गुंडगिरी लोकांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण ताण आणते. पीडित देखील स्वतःला दोष देऊ लागतो आणि प्रत्येक गोष्टीत रस गमावतो, पीडित व्यक्ति स्वतःला एकाकी समजू लागतात.
  • आत्म-सन्मान गमावणे: जेव्हा सायबर धमकी दिली जाते तेव्हा पीडित व्यक्ती स्वतःला असहाय्य समजू लागते. त्याचा/तिच्या स्वाभिमानावरही परिणाम होतो. पीडिते व्यक्तिला ते कोण आहेत याबद्दल तीव्र असंतोष वाटू लागतो. त्यामुळे त्यांना स्वतःच्या योग्यतेबद्दल शंका येऊ लागते.
  • आत्महत्येचे विचार आणि स्वत:ला हानी पोहोचवणे: जेव्हा सायबर गुंडगिरी असह्य होऊ लागते तेव्हा पीडित व्यक्ती ही टोकाची पावले उचलते. सतत सायबर गुंडगिरीला सामोरे जावे लागलेल्या व्यक्तींना उमेद गमावल्यासारखे वाटू लागते आणि त्यातून मुक्त होण्यासाठी ते टोकाची पावले उचलतात.

सायबर बुलिंग कशी थांबवावी?

सायबर गुंडगिरी हा एक असा गुन्हा आहे जो पीडित व्यक्तीच्या मानसिकतेवर कायमचा नकारात्मक प्रभाव पाडतो म्हणून सायबर धमकीने एखाद्याचे जीवन खराब होण्याआधी ते थांबवणे खूप महत्वाचे आहे. ऑनलाइन असणाऱ्या, स्मार्टफोन आणि त्यावरून विविध अनुप्रयोग वापरणाऱ्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या धोक्याला आळा घालण्यासाठी आपण खालील पावले उचलू शकतो:

  • अहवाल(रिपोर्ट): प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणत्याही सायबर धमकी पोस्ट किंवा संदेशाची तक्रार करण्यासाठी सोय असते. त्यांच्याकडे सायबर गुंडगिरी बद्दल स्पष्ट धोरणे आहेत आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून आक्षेपार्ह आणि दुखावणाऱ्या पोस्ट काढून टाकण्याची सोय देखील आहे. आपण लक्षात येणाऱ्या सायबर गुंडागिरीची सर्वात प्रथम त्याच प्लॅटफॉर्मवर तक्रार करू शकतो.
  • पीडित व्यक्तीला आधार देणे: पीडित व्यक्तीला सायबर बुलिंगच्या आघातातून बाहेर येण्यास मदत करण्यात इतर व्यक्ति मोठी भूमिका बजावू शकतात. आपण पीडित व्यक्तीला भूतकाळ विसरून त्याच्या सामान्य जीवनात परत येण्यासाठी सकारात्मकरित्या प्रेरित करू शकतो.
  • इतरांना सूचित करा: तुमच्या समवयस्कांकडे लक्ष द्या. एखाद्याच्या स्वभाव किंवा वर्तनात काही बदल झाला आहे का ते ओळखा आणि त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. पीडिते व्यक्तीला मानसिकआधार द्या आणि ऑनलाइन धमकावणाऱ्या सामग्रीची तक्रार करण्यात मदत करा.
  • सायबर गुंडगिरीला अवरोधित करा: सायबर गुंडगिरी थांबवण्याची सर्वात महत्वाची पायरी आहे ती व्यक्ती किंवा स्त्रोत जिथे सर्व गुंडगिरीची उत्पत्ती होत आहे त्याला अवरोधित (ब्लॉक) करणे.
  • विश्वासू व्यक्तीला सांगा: ज्या पीडिते व्यक्तिला गुंडांकडून सतत त्रास दिला जात आहे त्याने घटना आपल्या विश्वासू व्यक्ती जसे की पालक, शिक्षक, मित्र इत्यादींशी ताबडतोब सामायिक करा जेणेकरून ते हा गुन्हा वेळीच थांबवण्यासाठी योग्य पावले उचलू शकतील.

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा आपल्या आयुष्यातला शिरकाव धोकादायक आहे. इंटरनेट आता केवळ नेट कॅफे पुरते मर्यादित न राहता आपल्या खिशात सतत आपल्या सोबत राहत आहे. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन होणारी छळवणूक लक्षात येताच थांबवणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.