आमची बदललेली पतंगबाजी

माझ्यासाठी संक्रांतीचे वर्णन जणू एका रात्रीत बदलले असावे.

काल मी पतंग आणायला गेलो होतो, दोन चार दुकाने फिरल्या नंतर लक्षात आले की पतंगांचे एक दोनच प्रकार इथे उपलब्ध आहेत. एक रंगीत दोरभरी छोटे-मोठे आणि दुसरे म्हणजे प्लास्टिकचे पन्नीवाले. हे पतंग एका वेगळ्या पिशवीत व्यवस्थित बंद करून बाजारात विकायला आले आहेत. दोन रुपये, चार रुपये फारतर पाच रुपयांना मिळणारे पतंग आता तीस आणि पन्नास रुपयांना एक अशा भावात विकल्या जाऊ लागले तेव्हाच आपली ती संक्रांत संपली अन आता केवळ मार्केटिंग उरले आहे असे मनाला वाटून गेले.

इथल्या पतंग विकणाऱ्यांना डुग्गा, ढाच हे शब्दच माहित नसल्यागत प्रतिक्रिया आल्या. दक्षिणेकडे आणि मोठ्या शहरात असल्यामुळे आपल्याकडे मिळतात तसे पतंग मिळत नसतील कदाचित पण असे पतंग इतर लोक देखील उडवताना दिसले नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादला जावे आणि डुग्गा पतंग आणावेत असे वाटत होते.

मी डुग्गा, अंडा, ढाच पतंग उडवायचो. डुग्गा माझा सर्वात आवडीचा पतंग असायचा. डुग्गा म्हणजे उडवताना हलका आणि घिरट्या न घेता शांत उडणारा असे माझे गणित होते म्हणून मी डुग्गा पतंगच जास्त उडवायचो. डुग्गा फारतर एक रुपयाला मिळायचा. रंगीत आणि दोरभरी पतंग दोन तीन रुपयांना असत म्हणून मी ते आणत नसे, मी मुलखाचा कंजूस.

वीस रुपयांत भरपूर मांजा येत असे. असे फार तर पन्नास रुपये खर्च केले तरी आठवडाभर पतंग उडत असे. काल मात्र एक दोन दुकाने फिरून सातशे रुपयांचा खर्च करून आमची पतंगबाजीची तयारी पूर्ण झाली. तीस चाळीस रुपयांत पतंगबाजी करणाऱ्या मला पतंगाच्या दुकानावर सातशे रुपयांचा युपीआय करताना पार जीवावर आले होते. तेव्हाच बदलत्या काळाची एक छटा अनुभवायला मिळाली.

हे सारे काही बदल मोठ्या शहरांतच असतील कदाचित पण आमच्या सारख्यांना नवीन आहेत आणि बदलत्या जीवनशैली प्रमाणे हे देखील बदल आत्मसात करावे लागणार आहेत.

Add a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.