Site icon आशुतोष ब्लॉग

दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं

दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं

हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणतात, म्हणजे जे प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची काय गरज. आपल्या डोळ्यांना, फोटोमध्ये दिसते आहे म्हणजे ते खरेच असणार हे आपलं गृहीतक.

पण हे गृहीतक मोडून काढले ते “एआय” ने. एआयने खोट्या प्रतिमा बनवायचे काम सोपे केले.

रोज नवीन काही दाखवणारे खोटे फोटो आणि व्हिडीओ आपल्या समोर येतात. एखाद्या राजकीय नेत्याचा अपमान कारक फोटो, एखादा सेलेब्रिटीचं न केलेलं वक्तव्य, एखादा दैवी चमत्कार, एखादी न घडलेली घटना असे बरेच काही..

हे सगळं इतकं खरं दिसतं, की क्षणभर आपण थबकतो, आणि नकळत व्यक्त होतो, शेयर करतो, चिडतो, उत्साहित होतो, त्यावर काही ना काही प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करतो.

गंमत म्हणजे हा धोका निर्माण होतो तो फोटोच्या खरे खोटेपणा मुळे नाही, तर आपल्या डोळ्यांना दिसेल त्यावर विश्वास ठेवण्याच्या मानसिकतेमुळे.

आपल्या याच मानसिकतेचा फायदा घेतला जातो. आपल्यापाशी खोटं बोलणाऱ्या व्यक्ती आपल्याला जे ऐकायचे तेच सांगतात, आपला विश्वास बसेल तेच दाखवतात. तुमच्या आवडत्या नेत्याबद्दल काही चांगलं ऐकलं की तुम्हाला बरं वाटतं, नावडत्या व्यक्तीबद्दल काही चुकीचं दिसलं की आपण आपोआप शेयर करतो.

आपण जे बघतोय ते खरे की खोटे हे आपण तपासत नाही, कारण तपास करण्यात कष्ट पडतात, आणि या गोष्टी तपासल्याने सत्य उघड होते, जे आपल्याला रुचत नाही. आपल्याला जे आवडते, जे रुचते ते बघण्याची आपली मानवाची मानसिकता असते. 

एआय निर्मित हे फोटो आपली हीच तृष्णा भागवतात. त्या फेक फोटो, व्हिडिओला आपण सत्य मानून बसतो. ते आपल्या मनाला एक प्रकारचे समाधान मिळवून देतात. आणि त्यामुळेच याचा गैरफायदा घेतला जातो, आपल्या विचारांना, मनःशांतील थेट आव्हान दिले जाते. आपण त्यावर प्रतिक्रिया देतो आणि त्याचाच गैरफायदा घेतला जातो.

आणि हे काही नवीन नाही. AI च्या आधीही आपण हेच करत होतो. खोटा फोटो पूर्वीही बनायचा, फोटोशॉप होतंच. पण त्याला वेळ लागायचा, कौशल्य लागायचं. आता एक ओळ टाइप केली की क्षणात फोटो तयार होतो. खोटे फोटो, खोटी माहिती तयार करणं फुकट आणि झटपट झालंय, आणि म्हणूनच त्याचा महापूर आलाय.

तुमची आवडती व्यक्ती खोटं काहीतरी सांगायची, आपला आवडता राजकीय पक्ष खोट्या बातम्या प्रसारित करायचा, पुस्तकेच्या पुस्तके खोटी लिहिली गेलीत. त्यावेळीही माणूस फसायचा ते सत्य न तपासण्याच्या मानसिकतेमुळे.

AI ने नवीन काही केलं नाही, त्याने फक्त आपल्या जुन्या आळशीपणाला, तपासून न पाहण्याच्या मानसिकतेला खतपाणी घातलं.

या एआय मुळे, सगळंच खोटं असू शकतं, म्हटल्यावर आपण कशावरच विश्वास ठेवेनासे होऊ. खरा फोटोसुद्धा एआय निर्मित म्हणून धुडकावून लावू असंही होईल कदाचित.

आजवर “मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय” हा विश्वासाचा मुख्य पुरावा होता. तो आता लटका पडलाय. आता न फसणारी एकच गोष्ट उरते, ती म्हणजे थांबून विचार करण्याची सवय.

आपल्याकडे ही एक म्हण आहे “दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं!”

आता हीच गोष्ट आपण उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या फोटो आणि व्हिडिओंनासुद्धा लागू करायची वेळ आली आहे. त्यामुळे बघावं, पण डोळे झाकून विश्वास ठेवू नये!

Exit mobile version