आशुतोष ब्लॉग

जॅक्सन चा वध

जॅक्सन वध

जॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे

 

२१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन व्यक्ती त्या जॅक्सनसाठी,त्याची वाट पाहत नाट्यगृहात थांबल्या होत्या.

जॅक्सनला यायला उशीर होतोय म्हणून जरा बेचैन झालेला तो तरुण जॅक्सनसाठी राखीव ठेवलेल्या खुर्ची मागेच बसला होता.पडदे उघडले,नाटकाची नांदीहि झाली अन इतक्यात उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करत तो नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन आला.अन पाहुण्याच्या जागी समोरच्या रांगेत स्थानापन्न झाला.अगदी तयारीनिशी आलेल्या त्या तीन व्यक्तीही त्याला आलेला पाहून सुखावल्या,कारणही तसेच होते,त्या व्यक्ती आल्या होत्या, जॅक्सनचा वध करायला.त्या तीन व्यक्ती म्हणजे अभिनव भारतचे देशप्रेमाने ओतप्रोत भारलेले तरुण,विनायकराव देशपांडे,अण्णा कर्वे अन त्यातला अगदी लहान,उण्यापुऱ्या १९ वर्षांचा,तो तेजस्वी चेहऱ्याचा तरुण,अनंत लक्ष्मण कान्हेरे…!

बाबाराव सावरकरांना दिलेल्या काळ्यापाण्याच्या शिक्षेचा बदला हे एकमेव उद्दिष्ट घेऊन निघालेले अभिनव भारत चे ते क्रांतिकारक तरुण.भारतमातेला ह्या पापी इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्याची शपथ घेतलेले ते तरुण,इंग्रज सरकारने बाबारावांना केलेल्या शिक्षेचा राग मनात घेऊन,त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आज सिद्ध जाहले होते.

बाबाराव सावरकरांचा ह्या जॅक्सनने केलेला अपमान,टांगेवाल्याला चाबकाचे फटके देऊनही त्या विल्यम ला सहीसलामत सोडणारा हा जॅक्सन,स्वातंत्र्याप्रती तरुणांना प्रेरित करणाऱ्या तांबे शास्त्रींना अडकवणारा हा जॅक्सन,बाबासाहेब खरेंची वकिली सनद रद्द करून त्यांना कारागृहात धाडणारा हा जॅक्सन,वंदे मातरम गाणाऱ्या तरुणांवर खटले चालवणारा हा जॅक्सन, हा जॅक्सन गुन्हेगार ठरला होता,भारतमातेचा गुन्हेगार..! अन त्याचा प्रतिशोध घेण्याचा हा दिवस होता.काट्यानेच काटा काढायचा या वृत्तीच्या या तरुणांनी ही जॅक्सनच्या हत्येची व्यवस्थित योजना आखून,आता तिच्या अंमलबजावणीची वेळ होती.त्या कोवळ्या वयाच्या तरुणाने मनाशी केलेला निश्चय,औरंगाबादेत असताना गंगाराम मारवाड्या समोर जळता काचेचा कंदील हातात घेऊन केलेली भारतमातेच्या रक्षणाची शपथ आज पूर्ण करण्याची वेळ आली होती.अनंत लक्ष्मण कान्हेरे,हा चित्रकलेचा विद्यार्थी पण एरव्ही कुंचल्यावरून फिरणारी ती बोटं आज पिस्तुलाचा चाप ओढणार होती,कारण भारतमातेच्या या पुत्राचे ते कर्तव्यच असे तो समजत होता.

तिकडे मंचावर कोदंडरुपातले जोगळेकर “नामे ब्राह्मण खरा असे हा…” म्हणत प्रवेश करणार इतक्यात मंचासमोरून धाड धाड असे एकामागून एक गोळ्यांचे आवाज झाले,अन नाशिकचा तो दृष्ट जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.मागे बसलेल्या त्या क्रांतिकारी तरुणाने सुरवातीस एक गोळी आपल्या पिस्तुलाने पाठीमागूनच जॅक्सनवर झाडली पण ती चुकली म्हणून समोर येऊन पुन्हा चार गोळ्या झाडून त्या पापी इंग्रजाचा अंत ह्या तरुणाने केला. गोळ्यांचे आवाज ऐकता हा हा कल्लोळ माजला,अन तितक्यात विनायकराव देशपांडे आणि अण्णा कर्वे सभागृहातून बाहेर पडले,पण हा अनंत कान्हेरे,त्याचा उद्देश वेगळाच,त्याने दुसरेही पिस्तुल काढले आणि स्वतःच्या मस्तकी धरले,स्वतःलाही संपवण्याचा त्याचा प्रयत्न मात्र फसला,गोळी चालवण्याआधीच शेजारी उभ्या अधिकाऱ्याने त्याचा हात पकडून त्याला अटकाव केला.पुढे खटला चालला,गणू वैद्याच्या भित्रेपणामुळे इतरही साथीदार पकडले गेले,अनंत कान्हेरे,विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशीही दिल्या गेली.

अनंत कान्हेरे यांस फाशी दिले जाण्यापूर्वी काढलेले हे छायाचित्र (सौजन्य सावरकर संकेतस्थळ )

आपल्या कर्तुत्वाने त्या जॅक्सन चा वध करणारा हा केवळ १९ वर्षांचा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे इतिहासात अजरामर झाला.अनंत कान्हेरे सारखे वीरपुत्र जिच्या उदरात जन्मले अशी आपली भारतमाता आपल्या पुत्रांच्या कर्तुत्वाने पवित्र झाली,भारतमातेच्या प्रेमापोटी प्राणांची आहुती देणारे असे थोर क्रांतीकारक आपल्या मनांतून अन रक्तातून सदैव जिवंत राहायला हवेत.आज २१ डिसेंबर, जॅक्सन वधाच्या घटनेचे स्मरण करून आपण या वीराला अभिवादन करूया.

Exit mobile version