विकत घेऊन वाचले नाहीत असे कोरे करकरीत पुस्तकं बरेच आहेत. पण त्यातल्या एका पुस्तकाची कथा थोडी निराळी आहे. २०११ मध्ये रॉबिन शर्माचं “Who will cry when you die” हे पुस्तक विकत घेतलं होतं , एका प्रदर्शनात. त्यावेळी रॉबिन शर्मा लोकप्रिय झाले होते.
या पुस्तकासोबत लेखकाच्या एका सेमिनारची एक सीडी सुद्धा मोफत मिळाली होती, पुस्तकातच चिकटवलेली. आधी पुस्तक वाचू आणि नंतर सीडी पाहू असं ठरवून मी ते पुस्तक बाजूला ठेवलं. नंतर त्या पुस्तकाकडे या न त्या कारणाने माझं दुर्लक्ष झालं. मी ते पुस्तक वाचलंच नाही. त्यात सीडी आहे याचे तर मला भानच नाही.
आता फेब्रुवारी २६ मध्ये जुने पुस्तकं एकदा वाचूयाच म्हणून ठरवलं आणि हे पुस्तक मी १५ वर्षांनी वाचलं. पुस्तकातून मिळायचा ते बोध मिळाला फक्त तो थोडा काल सुसंगत राहिला नाही.
अन् त्यातली ती सीडी आजही त्याला तशीच चिकटवलेली आहे. त्या सीडी ची चलती असणारा एक काळ होऊन गेला. सीडी डीव्हीडी प्रकार खूप वापरला जायचा.
पण या पुस्तकातल्या त्या सीडी चे नशीब असं, मी ती कधीच उघडून बघितली नाही. आता मी ती उघडू शकतोय, पण तंत्रज्ञान एवढ्यात इतकं पुढे गेलं आहे की आज कोण सीडी वापरत नाही आणि ती सीडी पाहायला लागणारा सीडी प्लेअर डिव्हाईस चोर बाजारातून शोधून विकत आणावा लागेल, कुठे विकतात माहीत नाही. लॅपटॉप मधला प्लेअर तर कधीच गायब झाला आहे.
ती सीडी त्या पुस्तकात आजही तशीच अगदी नव्या सारखी चिकटवून ठेवली आहे. तंत्रज्ञान बदलून काळ लोटून गेला तरी पुस्तक न उघडलेला मी आता त्या सीडी कडे फक्त बघत बसलो आहे.
ती सीडी आता कदाचित कधीच चालणार नाही, पण तिने मला एक मोठा धडा दिला. आयुष्यात काही गोष्टींची एक ‘एक्सपायरी डेट’ असते. केवळ वस्तूंचीच नाही, तर संधींची आणि निर्णयांची सुद्धा. योग्य वेळी वाचलेलं पुस्तक आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्याचा प्रवास बदलू शकतो.
आज पुस्तक वाचून झालंय, पण ती पुस्तकात चिकटवलेली सीडी मला रोज आठवण करून देईल, उद्यावर ढकललेलं काम ‘आउटडेटेड’ व्हायला फार वेळ लागत नाही.