आशुतोष ब्लॉग

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं

सावरकरांबद्दल थोडंसं

शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्याचा लढा शिकवताना ‘सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान’ विषयावर एक छोटेखानी धडा असायचा, त्यात विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाने इंग्लंडमधून भारतात पिस्तुलं पाठवली म्हणून कसलीतरी काळ्या पाण्याची शिक्षा झाली वगैरे एका परिच्छेदात सांगितलेलं असायचं, आणि ह्याच व्यक्तीने रचलेली ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी कविता देखील बालभारतीला होती. ती एक कविता आणि ती काळ्या पाण्याची शिक्षा एवढीच काय सावरकरांची ओळख. त्यातही ही काळ्या पाण्याची शिक्षा काय हे शाळेत असताना न उमगलेले कोडे. कधी त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला नाही कारण परीक्षेत 2 मार्कांसाठी येणाऱ्या जोड्या लावा सोडल्या तर त्याचं काही महत्व नव्हतं.

पण पुढे या ना त्या रूपाने ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हळू हळू कळायला सुरुवात झाली आणि ह्या अचाट पराक्रम गाजवलेल्या माणसा बद्दल आपल्याला जराही माहिती नाही ह्याची खंत वाटायला सुरुवात झाली. मुळात सावरकर हा विषय शाळेतल्या मुलांपुढे अगदी मोजून मापून मांडला गेला त्यामुळे आम्ही गांधींजीना बापूजी म्हणून आदराने वागवतो तसं तात्याराव म्हणून कुणाला आदराने बोलावं अशी शिकवण आम्हाला मिळाली नाही. पण उशिराने का होईना,ह्या सावरकर नामक मनुष्याला “स्वातंत्र्यवीर” असं का संबोधतात ह्याचा उलगडा होत गेला.

सावरकर ही काही सामान्य व्यक्ती नव्हे,घरादाराची राखरांगोळी करून अख्खे कुटुंबच जळत्या अग्नित लोटलेला हा माणूस ब्रिटिशांच्या घरात जाऊन त्यांच्याच विरुद्ध कटकारस्थानं रचत होता. जेव्हा त्यांना ब्रिटन मध्ये अटक झाली त्या नंतर मोठ्या धाडसाने मार्सेलिस च्या समुद्रात उडी घेऊन ह्यांनी अख्ख्या जगाचं लक्ष भारतात चालू असलेल्या ब्रिटिश छळाकडे वेधलं गेलं,प्रत्यक्ष ब्रिटन च्या प्रधानमंत्र्याला माफी मागावी लागली हे सामान्य माणसाचं लक्षण नव्हे.पण अमेरिकन क्रांतीची बोस्टन टी पार्टी परीक्षेत जास्त गुण मिळवून द्यायची म्हणून हा इतिहास आम्हाला मार्सेलिस पेक्षा जास्त महत्वाचा वाटला.

तात्याराव सावरकरांचे काळे पाणी आणि माझी जन्मठेप ही पुस्तकं वाचली तेव्हा कळालं,कोचावर बसून फेसबुकवर लिहिता येऊ शकणारं आयुष्य खूप सोपं आहे आपल्यासाठी, अंदमान जेलच्या दगडी भिंती कोरून त्यावर काव्य लिहिणारे ते सावरकर ह्यांनी राष्ट्रभक्ती आणि मातृभूमी च्या प्रेमाखातर भोगलेल्या अमानवी शिक्षा पाहता हाच तो ‘स्वातंत्र्यवीर’ यावर विश्वास बसला.मंगल पांडेने केलेला 1857 चा उठाव हा उठाव नसून रचून केलेलं युद्ध होतं,त्यांच्याच शब्दांत ‘स्वातंत्र्यसमर होतं, हे सिद्ध करणारे सावरकर जरा उशिराने वाचले ह्याचं शल्य सारखं मनाला बोचत राहतं. यवन प्रदेशातून आलेला सिकंदर हा जगज्जेता नव्हता,त्याहून मोठे वीर हिंदूंच्या ह्या भूमीने जन्माला घातले होते हे सांगणाऱ्या सावरकरांच्या पुस्तकांवर बंदी घालायची गरज इंग्रजांना का पडली असावी?

सावरकरांनी आपल्या कवितांमधून देशभक्ती शिकवली, स्वातंत्र्याचा जयजयकार केला, कैदेतून सुटल्यावर दलित उद्धाराचे काम केलं, इंग्रजी भाषेला नाकारून मराठी भाषेला खूप मोठे योगदान दिले,मातृभाषेचा पुरस्कार केला,साहित्य निर्माण केले,अंधश्रद्धा झुगारून हिंदू धर्माला विज्ञानवादी दृष्टी दिली,अख्खे आयुष्य राष्ट्रसेवार्थ वेचिले अन शेवटी प्रयोपवेशन करून राष्ट्राचा निरोप घेतला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, तात्याराव, ही व्यक्ती समजून घेण्यास खूप अवघड आहे, आणि ज्यांना ती समजते त्यांना पचवून घेण्यास खूप अवघड आहे. कैदी म्हणून बोटीतून नेले जात असताना थेट समुद्रात झेपावण्याचं धाडस करणाऱ्या,अंदमानच्या अंधार कोठडीतही स्वातंत्र्याचे स्वप्न पाहू शकणाऱ्या ह्या वीर विनायकाचे कर्तृत्व लेखात,चौकटी पुस्तकात मावणारे नाही, आपले अख्खे 83 वर्षांचे आयुष्य राष्ट्रप्रेमात खर्ची घातलेल्या वीर विनायकाला काही पुस्तकं वाचून चार दिवसांत समजून घेण्याचा प्रयत्न हा माझ्या सारख्यांचा मूर्खपणा नाही तर काय?

Exit mobile version