आशुतोष ब्लॉग

लोकमान्य टिळक

आज 23 जुलै,म्हणजे लोकमान्य टिळकांची जयंती,अहो जयंती म्हणण्यापेक्षा याला फक्त टिळकांची आठवण काढण्याचा दिवस म्हणुया!
आज ठिकठिकाणी टिळकांच्या फोटोंना हार घातले जातील,शेंगांच्या टरफलांची गोष्ट सांगतील, पण हीच गोष्ट सांगणारी अन आजकाल काहिही ‘खाणारी’ मंडळी ती टरफलंतरी सोडतील की नाही ही शंकाच आहे,
कधी काळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ म्हणणारे टिळक, गरीबांची संपत्ती लुबाडुन आपली ‘साम्राज्य’ उभे करणाऱ्यांना काय समजणार?
टिळकांनी समाज एकत्र व्हावा म्हणून गणपती उत्सव सुरू केले,घरातले गणपती रस्त्यावर आणुन समाज व पर्यायानं राष्ट्र एकत्रीकरणाचा प्रयत्न त्यांनी केला,पण गल्लोगल्ली च्या राजकारणातुन,मंडळांनी उधळलेल्या पैशांतुन आज समाज एकत्रीकरण सोडा,आमचा बाप्पाच उत्सव सोडून निघुन जातो की काय अशी परिस्थिती आहे.

टिळकांनी ‘केसरी’ दिलं,’मराठा’ दिलं, त्या केसरी च्या डरकाळ्या कधीकाळी ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आणायच्या’ पण आज त्या डरकाळ्या फक्त निवडणुकीत मतं मिळवण्यापुरत्या राहील्यात,आणि हो त्या डरकाळ्या ‘केसरी’ ची शेळी कधी होईल याचा नेम नाही, आणि मराठा? अहो त्यावर तर कसलं राजकारण सुरू आहे आज!

टिळक मंडालेत असताना त्यांनी गीतेचे रहस्य उलगडले,पण त्यांची ती गीता वेगळीच, कौरव व पांडव मिळुन टरफलं खाणारा आजचा काळ, त्याची रहस्य तर खुद्द भगवान कृष्णालाही आजवर उमगली नाहीत…!

टिळक अहो टिळक,आम्हाला माफ करा,’स्वराज्य’ आणि या भारतवर्षासाठी रक्ताचं पाणी करू पाहणाऱ्या तुम्हाला कधीकाळी लोक-आधार होता म्हणून बहुदा तुम्हाला ‘लोकमान्य’ म्हणत असावेत, पण तुमच्या नावे मतांची पेटी आजच्या काळात रिकामीच रहात असल्यामुळेच बहुदा आम्ही तुम्हाला विसरलो!

अखंड राष्ट्रनिर्मितीसाठी झटणारा ‘केसरी’ आज मात्र आम्ही एका ‘जाती’ च्या ‘पिंजऱ्यात’ आम्ही बांधून टाकला!

स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्कांची जाणीव ठेवणाऱ्या तुम्हाला जन्मदाखल्याच्या जातीचं लेबल लावणारे आम्ही पामर कधीच समजुन घेउ शकलो नाहीत!

टिळक महाराज,आज तुमची जयंती म्हणून तुम्हाला शिरस्तया प्रमाणे आम्ही तुम्हाला हार घालु,फुलं वाहू,न उरलेल्या टरफलांची गोष्ट सांगु,पण मनात तुमची प्रतिमा बसवणं आम्हाला कदापी जमणार नाही,

टिळक तुम्ही पुन्हा जन्म घ्या, पुन्हा केसरी व्हा, आणि पुन्हा प्रश्न करा ‘देशातल्या जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?’

– आशुतोष म्हैसेकर

Exit mobile version