आशुतोष ब्लॉग

सावरकर: एक कडवट औषध

सावरकर हे औषध आजवर कुणालाच पचलेलं नाही. महाभयंकर आजार क्षणात नाहीसं करणारं अत्यंत कडवट औषध म्हणजे सावरकर. ते औषध कडू लागतं म्हणून तुम्ही घेण्यावाचून राहत असाल तर आजाराने मेल्या वाचून राहणार नाही.

अंधार कोठडीत,कोलू फिरवत,हाती पायी बेड्या पडून दिवसरात्र भिंतीला जोखडून ठेवले असताना “मारील रिपू जगती असा, कवण जन्मला” असा आत्मविश्वास देणारं हे औषध.

स्वातंत्र्यदेवतेची उपासना करत राष्ट्रप्रेमाची ज्योत कायम आमच्या हृदयात तेवत ठेवायची शिकवण देणारं हे औषध आहे. मार्क्स काय म्हणाला, लेनिन काय सांगून गेला,लिंकन ने कुणाला पत्रं लिहिली ह्यापेक्षा सावरकर या औषधाच्या लसी टोचून घेण्याची देशातल्या प्रत्येकाला फार गरज आहे.

सावरकर नावाचं औषध आजच्या त्यांच्या विरोधकांना पचेल हे अपेक्षितच नाही, पण त्यांचे अनेक विचार त्यांच्या समर्थकांनाही पचणार नाहीत असेच. सावरकरांचे राजकीय समर्थकही हे औषध वेचून निवडून मगच घेतात हे विशेष.

आज आम्ही एका विचित्र वैचारिक व्याधीने ग्रासलो आहोत. एकीकडे सावरकरांच्या नावावर बेगडी राजकारणी समर्थक आहेत आणि दुसरीकडे अंदमानच्या अमानुष यातनांना हिणवणारे विरोधक! एकाला सावरकर हे औषध हवं आहे पण अगदी मोजून मापून, कडवट लागणार नाही असंच, आणि दुसऱ्यांना तर हे औषध समजून घेण्याची बुद्धीच नाही. 

आम्ही त्यांच्या विचारांची सोयीस्कर छाटणी करून, आमच्या छोट्या चौकटीत बसवू शकत नाही. सावरकर हे एक अथांग समुद्र आहेत, तिथून चमचाभर पाणी काढून स्वतःची तहान भागवणारे आम्ही कोण? एकतर सावरकर पूर्ण स्वीकारा, नाहीतर पूर्ण नाकारा! कारण अर्धवट घेतलेले कडू औषध रोगापेक्षाही जास्त घातक ठरू शकतं.

सावरकर हे काही रोज रात्री थोडं थोडं घेण्याचं टॉनिक नाही, ते एक जहाल रसायन आहे त्याला रक्तात भिनवावं लागणार. राजकीय स्वार्थापोटी सावरकरांवर पोकळ गप्पा मारणारे, किंवा त्यांच्यावर चिखलफेक करणारे आज एका विचित्र व्याधीने आजारी आहेत.

आणि कडवट औषधाची गरज आजारी माणसालाच असते! 

Exit mobile version