आशुतोष ब्लॉग

मी आणि माझी मराठी भाषा

माझी मराठी भाषा

माझं मराठीवर प्रेम आहे आणि मला कुठल्याही भारतीय भाषेचं वावगं नाही. मराठी श्रेष्ठ म्हणायला मला भारतीय भाषांना दुय्यम म्हणायची गरज पडत नाही. #मराठी


मला इंग्रजीचा तिटकारा येतो, पण ती आजच्या काळात व्यवहारासाठी मला वापरावीच लागत आहे.
होता होईल तितकं शक्य आहे तिथे मी मराठीच वापरतो. कार्यालयीन कामकाजात मराठी बोलणारे असतात अशांना आवर्जून मराठी बोलतो. त्यातून माझे संबंध चांगले टिकतात. एक आपलेपणाची भावना वाढते.
मी अमराठी लोकांशी इंग्रजीत बोललो तर ते यांत्रिक वाटतं. त्या ऐवजी त्यांच्या बोली भाषेतले एकदोन शब्द, त्यांच्या धाटणीची हिंदी बोलली तर जास्त उपयुक्त ठरते.


आपल्याला काय कुठल्या भाषेचे शत्रुत्व उचलायचे नाही. त्यातल्या त्यात भारतीय भाषेचे अजिबात नाही. पण एखादी भाषा एखाद्यावर लादायची देखील नाही. भाषिक आक्रमणाला तर विरोधच व्हायला हवा.


इंग्रजी ही देखील माझ्यावर लादलेली भाषा आहे असेच मी समजतो. भारतीय लोकांनी इंग्रजांकडून लादून घेतलेली भाषा आहे. आपणच ती जोपासली त्याचीच शिक्षा म्हणून का होईना इंग्रजीला टाळण्याचा पर्याय आपल्याकडे नाही. ती वापरावीच लागते.
पण अशी इतर कुठली भाषा लादली जाण्यापासून आपण रोखू शकतो. इंग्रजीचा वापर फक्त पाश्चिमात्य लोकांशी बोलण्या पुरता मर्यादित राखू शकतो.


परक्या देशातील लोकांना आपण ग्लोबल वाटलो पाहिजे आणि आपल्या देशातल्या लोकांना आपण लोकल वाटलो पाहिजे.
पण आपलं उलटं आहे, दोन भारतीय मिळून एकमेकांवर इंग्रजी झाडून घरात ग्लोबल होण्याचा दिखावा करतात. आणि जिथे इंग्रजी वापरायची तिथे Indian Accent च्या गोंडस नावाखाली आम्ही किती लोकल आहोत हे दाखवतात.
भाषा हे माहितीची देवाण घेवाण आणि संपर्काचे साधन आहे. त्यामुळे माहितीची देवाण घेवाण करण्याचा कार्यभाग योग्य भाषा योग्य ठिकाणी वापरून आपला फायदा साधून घ्या.


नेमकं व्यवहारात भाषा विषयाला अस्मितेचा विषय बनवायचा ह्यातून आपला फायदा होण्या ऐवजी नुकसान होईल असे मला वाटते.
भाषा हा अस्मितेचा विषय आहे,तीच आपली अस्मिता आहे, तिला जोपासले पाहिजे, पण त्याची सुरुवात आपल्या घरात हवी. आपल्या घरात आपण मराठी बोलणार नाही मात्र बाहेर जाऊन तिथे आम्ही मराठी बोलू ह्यात काय साध्य होते?
दोन मराठी माणसं महाराष्ट्रात इंग्रजी बोलतात, तीच दोन माणसं बाहेर ठिकाणी मराठी मराठी म्हणून गळ्यात पडतात. हा मला दिखावा वाटतो. तुम्ही आधी घरात सुरुवात करा, मग जगाचा विचार करा.


मराठी जोपासायला मी घरात मराठी बोलतो,भारतीय बोली बोलतो, परकियांना इंग्रजी! इतकं साधं गणित आहे. हे गणित आपल्या यशाचा फॉर्मुला ठरेल. जगासाठी भारत ग्लोबल आणि भारतीयांसाठी लोकल बनून आपली नाळ सर्वांशी जोडलेली राहील.

Exit mobile version