हैदराबाद स्टेट, निजामाच्या हैदराबाद राज्यात अत्याचारांचे स्तोम माजले होते ह्यात दुमत नाहीच. सर्वच गोष्टींत दडपशाही, लोकांचे अनन्वित छळ, हिंदूंच्या धार्मिक गोष्टींवर बंदी, रझाकारांचे अत्याचार या गोष्टींमुळे जनतेत असलेल्या यत्किंचितही तमा नसलेला सातवा निजाम मीर उस्मान अली खान आपली ऐषोआरामाची जिंदगी जगत होता.
वर्षानुवर्षे हे अत्याचार होत असताना राज्यातली बहुसंख्य हिंदू जनता घरात पळी पंचपात्रे वाजवत बसली असेल का? निजामाने आयुष्यात किमान एक क्षण ह्या गोष्टीचा विचार केला असता तर इतिहासातील एक मोठा रक्तपाती संघर्ष टळला असता. पण निजामाने त्याच्या ऱ्हासाची कहाणी स्वतःच्या जुलुमी कर्मांनीच लिहिली होती.
नारायणराव पवार, मूळचे वारंगलचे. वारंगल इथेच इंटरचे शिक्षण पूर्ण झाल्यावर कायद्याचे (लॉ) चे शिक्षण घ्यायला हैदराबाद येथे आले. हैदराबादे राज्यात आर्य समाजाचा प्रभाव होताच, नारायराव देखील आर्य समाजी. १९४६ साली त्यांनी हैदराबादेत जिन्नाचे भडकावणारे भाषण ऐकले आणि त्यांनी जागीच “स्वाभिमानाशिवाय जगणे, हे मरणच” असा विचार करून आपले आयुष्य स्वराज्यासाठीच अर्पण करण्याचा त्यांनी निश्चय केला. बालकिशन, गुंडाईय्या आर्य. जगदीश आर्य अशा मित्रांसोबत मिळून देशकार्यात सहभागी झाले.पण नेमके करायचे काय ते सुचेना.!
एके दिवशी नयापूलजवळ त्यांनी पाहिले, रोज सायंकाळी निजाम त्याच्या किंग कोटी राजवाड्यातून बाहेर पडे, आपल्या आईच्या कबरीवर फुले वहायला. त्याच्यासाठी पोलीस रस्ते अडवत. हे पाहताच त्यांच्या डोक्यात एक आग उसळली. ह्या निजामालाच संपवून टाकायचं! लक्षावधी लोकांवर कित्येक दशके चाललेल्या अत्याचाराचं हे विषारी झाड मुळासकट उपटून टाकायचं. झाले, ठरले.
नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा” या उक्तीवरून प्रेरित होऊन, हे तरुण तयारीला लागले. जागेची पाहणी केली गेली. मुंबईस जाऊन बॉम्ब आणले गेले. सोलापुरातून पिस्तूल आणि विषाच्या बाटल्या मिळवल्या. जगदीश आर्य, गुंडय्या आणि नारायणराव हे १९-२० वर्षांचे तिघे तरुण सज्ज झाले, निजामाचा वध करायला.
४ डिसेंबर १९४७, अवघा भारत नव-स्वातंत्र्यचा सुवर्णकाळ उपभोगत असताना, हे तीन तरुण भारताच्या मध्य मध्यभागात उगवू पाहत असणाऱ्या एका छोट्या पाकी विषवल्लीला अंत करायला सज्ज होते. हाती बॉम्ब, बॉम्ब फेकण्यात चूक झाली तर पिस्तूल आणि पकडले गेलो तर विषाच्या बाटल्या घेऊन हे तीन तरुण एका गल्लीच्या तोंडाशी उभे राहिले. ‘किंग कोटी’ हैदराबादच्या मध्यवस्तीत असलेल्या, “किंग कोटी” मधून निजामाची चारचाकी बाहेर येताच नारायणरावांनी त्यांची सायकल भिंतीला टेकवली, आणि बॉम्बची पिन काढून थेट निजामाच्या गाडीच्या दिशेने भिरकावला. अलबत, एक मोठा आवाज झाला, बॉम्ब फुटला, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, गोंधळ माजला पण निजामाची गाडी चुकून सुरक्षित बाहेर निघाली. निजाम वाचला, नारायणरावांनी पिस्तूल काढले, गोळी चालणार तोच जवळच्या पोलिसाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडले. निजाम वाचला…!
पोलिसांच्या हाती लागलेल्या, जागेवरच प्रचंड मारहाण झालेल्या नारायणरावांवर निजामाच्या इस्लामी पोलिसांच्या हाती काय अत्याचार झाले ह्याचे वर्णन करायला नकोच. नशिबाने निजाम वाचला खरा, पण त्याची ती क्रूर गादी फार काळ टिकू शकली नाही. नारायणरावांनी फेकलेला तो बॉम्ब निजामवरच नाही, तर तो बॉम्ब हैदराबाद च्या जुलुमी राजवटीवर होता. नारायणरावांसारख्या शूर वीर तरुणांच्या पराक्रमाचे फलावसान झाले ते हैदराबाद राज्याचा कायमचा अंत होण्यामध्ये. पुढच्या दहा महिन्यांतच निजामाचे साम्राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आणि तो केवळ नावाचा निजाम राहिला. फाशीची शिक्षा झालेले नारायणराव हैदराबाद स्वातंत्र्यानंतर सुटकेतून कायमचे मुक्त झाले.
निजाम, रझाकार, रझवी यांच्या अत्याचारांनी रक्तरंजित हैदराबाद मराठवाड्याच्या भूमीला नारायणरावांसारख्या तरुणांच्या पराक्रमाने स्वातंत्र्याचे पावित्र्य मिळवून दिले. त्या तेजस्वी तरुणाईने जुलमी राजवटीची पाळेमुळे खणून काढली. त्यांच्या धडाडीने प्रत्येक मनात क्रांतीची ज्योत पेटवली. तलवारीच्या धारेने त्यांनी अन्यायाचा अंधार चिरला आणि स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. त्यांच्या शौर्यापुढे निजामाचे साम्राज्य निष्प्रभ ठरले. अशा या वीरांच्या बलिदानानेच हैदराबाद मुक्त झाले.
नारायणरावांच्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्याचे ब्रीद सांगितले
“सर कटा सकते है, लेकिन सर झुका सकते नही”
– आशुतोष