थेप्पकुळम
हा शब्द पहिल्यांदा कानावर पडला तेव्हा मलाही काही कळेना, वाटलं काहीतरी वेगळंच आहे.
मदुराईला संध्याकाळी फिरायला निघालो होतो. गुगलवर पाहिलेल्या एका सुंदर अशा “वंडीयुर मरीअम्मन” मंदिराचा पत्ता रिक्षावाल्याला सांगत होतो, पण त्याला काही केल्या कळेना. शेवटी मोबाईलवर नकाशा दाखवला, आणि त्याचा चेहरा एकदम उजळला. “आ, थेप्पकुळम.!”
थेप्पकुळम म्हणजे मोठ्या तलावाच्या मधोमध वसलेलं एक शांत मंदिर. रात्रीच्या वेळी इथे दिव्यांच्या प्रकाशात त्या तलावाचे सुंदर मनमोहक चित्र उभे राहते. पण खरं सांगू, मला त्या मंदिरापेक्षा तिथली संध्याकाळ आणि माणसं जास्त लक्षात राहिली.
सूर्यदेवाने पश्चिमेचा काठ धरला तसा त्या थेप्पकुळम तलावाच्या काठावर माणसांचा मेळा भरला होता. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं तलावाच्या शांत पाण्यावर पडली होती, जणू काही अथांग पाण्यावर सोन्याचा सडाच विखुरला होता. हवेत एक मंद गारवा आणि कमालीची शांतता होती.
कुणी कुटुंबासोबत गप्पा मारत होतं, कुणी मित्रांच्या घोळक्यात हास्यविनोद करत होतं, तर कुणी नुकतंच लग्न झालेलं जोडपं भविष्याची स्वप्नं विणत होतं. एका कोपऱ्यात आजी-आजोबा शांत बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावर सात्विक समाधान होतं; आणि त्यांच्याच पुढ्यात नातवंडं मजेत दंगा करत इकडून तिकडे पळत होती.
या गर्दीच्या गजबजाटातही एक विलक्षण संथपणा होता. आणि गर्दीतच कुठेतरी, जगाचा विसर पडलेला, कुणी एकटाच येऊन पाण्याकडे बघत बसलेला एखादा आपल्याच धुंदीत हरवलेला दिसत होता.
वयं वेगळी, माणसं वेगळी, पण एक गोष्ट मात्र सगळ्यांत सारखी होती – ती म्हणजे निवांतपणा! तिथे जमलेली प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने मनावरचं ओझं उतरवत होती. कामाचा शीण, आयुष्यातल्या चिंता, टेन्शन आणि दिवसभराचा थकवा या सगळ्याला मागे सारून, ते सगळे नकळतपणे त्या संध्याकाळचा मनसोक्त आनंद घेत होते.
कुणीही काही सिद्ध करायच्या प्रयत्नात नव्हतं. तिथे फक्त जगण्याची स्पर्धा विसरून स्वतःच्या विश्वात रममाण झालेली माणसं होती. स्वतःच्या अस्तित्वात हरवून गेलेली ती शांत संध्याकाळ होती.
ते दृश्य मला विलक्षण भावलं. त्या क्षणाला, त्या थेप्पकुळमला आलेलं महत्त्व केवळ त्या दगडी भिंतींच्या मंदिरामुळे नव्हतं, तर तिथे नकळतपणे स्वतःच्या मनावरचं ओझं हलकं करणाऱ्या त्या प्रत्येक जिवामुळे होतं. ते मंदिर आणि तो तलाव म्हणजे केवळ एक वास्तू नव्हती, तर मानवी भावनांच्या विसर्जनाचा तो एक पवित्र घाट झाला होता.
मनःशांती कुठे विकत मिळत नाही. ती मिळवायला मोठं काही करावं लागत नाही. फक्त कुठेतरी निवांत थांबता यायला हवं, कुणाशीतरी मनमोकळ्या गप्पा करता यायला हव्यात. आपण नेमकं तेच विसरलोय.
घरी परतताना एक विचार मनात चमकून गेला की, मनाला निवांतपणा देणारी थेप्पकुळम ही काही जगातील एकमेव जागा नाही. अशी शांत संध्याकाळ अनुभवता येईल आणि मनाचा थकवा दूर होईल अशी एक जागा प्रत्येक गावात, शहरात आणि अवतीभवती असतेच. आपण जर थोडी नजर फिरवली, तर आपल्यालाही आपलं हक्काचं थेप्पकुळम अगदी सहज गवसेल.
कुणाला ती आईच्या मांडीवर सापडते, कुणाला मित्राच्या खांद्यावर. कुणाला प्रेयसीच्या मिठीत, तर कुणाला देवाच्या गाभाऱ्यात. ठिकाणं वेगळी असतील, संदर्भ निराळे असतील, पण त्यांचं कार्य मात्र एकच, अस्वस्थ मनाला मायेची फुंकर घालणं. जिथे पोहोचल्यावर जगाचा विसर पडतो आणि आपलं मन पूर्णपणे मोकळं होतं, तेच खरं आपलं ‘थेप्पकुळम’.
आपण आपल्या सुख-सुविधा वाढवत गेलो, मोठ्या घरांत राहायला गेलो, पगाराचे आकडे आणि गाड्यांचे मॉडेल्स बदलत गेलो. सोशल मीडियावर रील्स स्क्रॉल करत आणि स्टोरीज पोस्ट करून व्ह्यूज मिळवण्यात आपण मग्न झालो. पण या सगळ्यात, मनाचा कोपरा मोकळा करण्यासाठी जी हक्काची जागा हवी असते, तीच कुठेतरी हरवून बसलोय. आजकाल सर्व काही असूनही माणूस मनातून प्रचंड थकलेला असतो.
त्यामुळेच असं वाटतं की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक ‘थेप्पकुळम’ असायलाच हवं. अशी जागा, जिथे गेल्यावर आपल्याला काहीही मिळवायचं नसतं; उलट, आपल्या मनावर साचलेलं सगळं ओझं तिथेच उतरवून मोकळं व्हायचं असतं.
तुमच्या मनाला विसावा देणारं हक्काचं ‘थेप्पकुळम’ कोणतं?
