मला एआयचा पहिला चुकीचा अनुभव २०२३ च्या सुरुवातीला आला होतं. चॅट जीपीटी नवीन होतं तेव्हा.
आमच्या टेक्नॉलॉजीत एका गोष्टीत माझं स्पेशलायझेशन आहे. त्या विषयातले अनेक लोक माझ्याशी संपर्कात येतात. त्यामुळे माझे नेटवर्क चांगले झाले.
एकदा मला एका पब्लिशिंग कंपनी कडून फोन आला. नंतर ईमेल वर संभाषणे झाली. हे पब्लिशर सायबर सेक्युरिटी च्या बऱ्याच विषयांत टेक्निकल पुस्तके ई – बुक स्वरूपात लाँच करणार होते. त्यातल्या माझ्या विषयात एक पुस्तक कुणी एकाने तयार केलं होतं, त्यातल्या टेक्निकल गोष्टींचे प्रूफ रिडींग त्यांना हवे होते. त्यासाठी त्यांनी मला विनंती केली होती. बदल्यात काही मानधन, आणि पुस्तकासोबत टेक्निकल गायडन्स खाली माझं नाव दिलं जाईल अशी ती गोष्ट होती. काहीतरी नवीन करायला मिळतंय म्हणून मी देखील तयार झालो.
त्यांनी कॉन्ट्रॅक्ट वगैरे करून नंतर मला त्या पुस्तकाचे एक एक भाग ड्राफ्ट म्हणून पाठवले. जवळपास ३००-३५० पानांचं पुस्तक एका विषयात लिहिलं होतं. मी उत्साहाने ते एक एक भाग वाचून, त्यातले टेक्निकल विषय योग्य आहेत की नाही हे तपासत त्यावर बदल असतील तर मी नोंद करत होतो.
पहिले १-२ भाग वाचून झाल्यावर मला काहीतरी लक्षात आलं. त्या पुस्तक लिहिण्याच्या भाषेत एकप्रकारचा तोच तो पणा होता. एकच वाक्य फिरवून पुन्हा पुन्हा लिहिल्यासारखी भाषा झाली होती. एखादी अगदी छोटी कन्सेप्ट लिहिण्यासाठी मोठे पॅराग्राफ त्यात लिहिले होते. मला ते वाचण्याचाही कंटाळा येऊ लागला. पण वाचून त्यावर प्रतिक्रिया पाठवणं मला भाग होतं.
यामुळे मला लक्षात आलं, ही भाषा एखाद्या माणसाने लिहिल्यासारखी नाही. अगदी यांत्रिक भाषा. त्यावेळी डोक्यात प्रकाश पडला, हे अख्खे पुस्तकंच चॅट जीपीटी वरून छापले होते. मी त्या सॉफ्ट कॉपीचा काही भाग, एआय डिटेक्टर मध्ये टाकून पाहिला, त्या विषयावर मी चॅट जीपीटी ला कमांड देऊन पाहिली आणि ते ३५० पानांचं पुस्तक चॅट जीपीटी वरून जसं च्या तसं उतरवलं आहे हे स्पष्ट झालं.
आमच्या किचकट विषयांत कुणीतरी पुस्तक लिहितंय म्हणून मी आनंदात होतो. मला काहीतरी नवीन करायला मिळेल म्हणून मी उत्साहात होतो. पण त्या चॅट जीपीटीच्या फसलेल्या प्रयोगाने प्रपंच खोटा ठरला. त्या प्रकाशक कंपनीला मी हे कळवलं, त्यांना सूचित केलं आणि ते काम तिथेच सोडून द्यावं लागलं. पुन्हा त्या प्रकाशकांनीही मला संपर्क केला नाही.
त्यावेळी नवीन असलेला चॅट जीपीटी आणि एआय या प्रकारचा कसा दुरुपयोग होतोय याचा अनुभव घेतला. त्यामुळे ताक सुद्धा एकदा फुंकून प्यावं लागणार अशीच काहीशी मनस्थिती झाली होती. अख्खं पुस्तकच चॅट जीपीटी केलं होतं तो प्रकार आता सर्वत्र होतो. एआय आल्यामुळे लोक कचऱ्याने लिखाण करत सुटले आहेत, हा एआय चा एक दुष्परिणामच म्हणायचा..