आजकाल सायबर फसवणुकीच्या बातम्या रोज कानावर पडतात. पण या बातम्यांमागे दडलेली एक कटू सत्यकथा आहे. सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यानंतर त्याचे मानसिक परिणाम कसे होतात? लोक त्या व्यक्तीकडे कोणत्या नजरेने पाहतात? फक्त पैशांचे नुकसान नाही, तर त्याहून मोठा आघात मनावर होतो. ही आहे दिनकररावांची कथा…
दिनकरराव, एक निवृत्त शाळेचे मुख्याध्यापक. त्यांनी आपल्या आयुष्याची ४० वर्षे शिक्षणासारख्या पवित्र कार्यात घालवली होती. गावात त्यांना केवळ मुख्याध्यापक म्हणूनच नव्हे, तर एक मार्गदर्शक आणि ज्ञानाचा सागर म्हणून ओळखले जात असे. त्यांचे बोलणे नेहमी विचारपूर्वक, शांत असे. कोणतीही समस्या असो, दिनकररावांचा सल्ला घेण्यासाठी लोक त्यांच्या घरी येत असत. त्यांच्या घरी नेहमीच एक छोटी लायब्ररी असे, जिथे ते रोज वर्तमानपत्रे आणि नवनवीन पुस्तके वाचत असत.
निवृत्तीनंतरही ते शांत बसले नव्हते. सकाळी फिरायला जाणे, गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे, आणि हो, तंत्रज्ञानाशीही ते जुळवून घेत होते. स्मार्टफोनवर बातम्या वाचणे, व्हॉट्सॲपवर माहितीची देवाणघेवाण करणे, अगदी इंटरनेट बँकिंगचा वापरही ते स्वतःच करत. “आजच्या काळात अपडेटेड राहणं गरजेचं आहे,” असं ते नेहमी म्हणायचे. त्यांना सायबर फसवणुक होते ह्यांची चांगली माहिती होती. ते बातम्यांतून सायबर फसवणुकीबद्दल वाचत. पण त्यांना वाटायचं, “मी इतका सावध आहे, मला तंत्रज्ञानाची माहिती आहे, मी कधीच अशा फसवणुकीला बळी पडणार नाही.”
तो एक फोन आणि जीवनातील अनपेक्षित वळण
एका दुपारी दिनकरराव आपल्या बागेत बसून पुस्तक वाचत होते. निवांत दुपार होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याची मंद झुळूक मन शांत करत होती. तेवढ्यात त्यांच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. पलीकडून बोलणारी व्यक्ती स्वतःला एका मोठ्या बँकेचा ‘वरिष्ठ अधिकारी’ सांगत होती. त्या व्यक्तीच्या आवाजात कमालीचा आत्मविश्वास होता, बोलण्यात एक प्रकारची व्यावसायिकता होती, आणि प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडलेला होता.
“नमस्कार सर, मी बँक ऑफ इंडियामधून बोलतोय. माझं नाव राहुल शर्मा. तुमच्या खात्यात एक गंभीर तांत्रिक त्रुटी आढळली आहे. ही त्रुटी त्वरित दुरुस्त न केल्यास, आज रात्री १२ वाजेपर्यंत तुमचे खाते कायमचे बंद केले जाईल आणि तुमच्या सर्व ठेवी गोठवल्या जातील,” राहुल शर्मा बोलत होता, त्याच्या आवाजात एक प्रकारची तातडीची सूचना होती.
दिनकरराव क्षणभर गोंधळले. त्यांचे बँकेत मोठे व्यवहार होते आणि खातं बंद होण्याची कल्पनाच त्यांना अस्वस्थ करून गेली. “पण मी काय करू? बँकेत येऊन भेटू का?” दिनकररावांनी विचारले.
“नाही सर, बँकेत येण्याची गरज नाही. ही तांत्रिक अडचण आहे, ती इथे बसूनच दूर करता येईल. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठीच फोन केला आहे. तुम्हाला फक्त एक छोटे ‘बँक सपोर्ट’ ॲप डाउनलोड करावे लागेल आणि आम्ही सांगू ती माहिती भरावी लागेल. हे फक्त ५ मिनिटांचे काम आहे आणि तुमचे खाते सुरक्षित राहील.”
दिनकररावांच्या मनात थोडी शंका आली. बँकेतून असे फोन येत नाहीत, हे त्यांना माहीत होतं. पण समोरच्या व्यक्तीचा आवाज इतका विश्वासार्ह होता, आणि खातं बंद होण्याच्या भीती इतकी मोठी होती की, त्यांच्या विचारांना गती मिळाली नाही. “तुम्ही मुख्याध्यापक आहात, तुम्हाला कशाची भीती? आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत,” असे शब्द राहुल शर्माने मोठ्या आदराने उच्चारले. याच शब्दांनी दिनकररावांचा थोडासा राहिलेला संशयही दूर केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲप डाउनलोड केले आणि काही गोपनीय माहिती, अगदी त्यांच्या बँकेचा पासवर्ड आणि ओटीपीसुद्धा, त्या ‘अधिकाऱ्याला’ दिला.
पुढच्या काही मिनिटांतच त्यांच्या फोनवर एकामागून एक मेसेज येऊ लागले. ‘तुमच्या खात्यातून ५०,००० रुपये काढले गेले’, ‘पुन्हा १,००,००० रुपये काढले गेले!’ दिनकररावांना काही कळायच्या आत, त्यांच्या आयुष्याची जमापुंजी असलेला मोठा हिस्सा त्यांच्या डोळ्यांदेखत गायब झाला होता. त्यांचा फोन हातातून खाली पडला. बागेतील शांतता अचानक भयाण वाटू लागली.
सायबर फसवणुकीनंतर समाजाचा बदललेला दृष्टिकोन आणि मनावरचे घाव
पैसे गेल्याचं कळल्यावर दिनकररावांना धक्काच बसला. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. “माझ्यासोबत असं कसं झालं? मी इतका सावध असूनही?” हाच प्रश्न त्यांच्या मनात वादळासारखा घोंगावत होता. त्यांना स्वतःची लाज वाटू लागली. इतके वर्षं त्यांनी समाजात प्रतिष्ठा जपली होती, ज्ञानाचा दिवा म्हणून ज्यांना ओळखले जात होते, तेच आज फसवले गेले होते. त्यांना वाटलं, लोक काय म्हणतील? त्यांची इज्जत आता कशी राहील?
गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला काहीजण सहानुभूती दाखवत होते, पण हळूहळू अनेकांच्या नजरेत एक प्रकारचा उपहास दिसू लागला. “अहो, मुख्याध्यापक असूनही फसवले गेले? त्यांना कळायला नको होतं का? इतके शिकलेले असूनही असे फसतात का?” असे कुजबुजणे त्यांच्या कानावर येऊ लागले. चहाच्या टपरीवर, मंदिराच्या पारावर लोक त्यांच्याबद्दल बोलताना दिसत होते. त्यांच्याच काही जुन्या मित्रांनीही त्यांना टाळायला सुरुवात केली.
दिनकरराव घरातच थांबायला लागले. त्यांना बाहेर पडायची लाज वाटू लागली. पूर्वी सकाळी फिरायला जाणारे दिनकरराव आता घरातच कोंडून राहिले होते. त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. रात्री त्यांना झोप लागत नसे. दिवसाही ते विचारात गढलेले असत. त्यांना वाटत होतं, मी काहीतरी खूप मोठी चूक केली आहे, ज्यामुळे मी आता लोकांच्या नजरेतून उतरलो आहे.
सहानुभूतीचा स्पर्श: एका विद्यार्थ्याची भेट
दिनकररावांना आता फक्त गमावलेल्या पैशांची चिंता नव्हती, तर समाजातून मिळणारा दुरावा आणि स्वतःचीच लाज त्यांना आतून पोखरत होती. त्यांना वाटत होतं, मी काहीतरी खूप मोठी चूक केली आहे, ज्यामुळे मी आता लोकांच्या नजरेतून उतरलो आहे.
पण एक दिवस त्यांच्या दारात एक तरुण उभा होता. तो होता त्यांचा जुना विद्यार्थी, ‘अभिजीत’. अभिजीत आता शहरात आयटी क्षेत्रात काम करत होता. दिनकररावांबद्दलची बातमी त्याच्या कानावर आली होती आणि तो अस्वस्थ झाला होता. त्यांना भेटण्यासाठीच खास तो गावी परत आला होता.
अभिजीतने पाहिले की, दिनकरराव कोणाशीही बोलत नव्हते, गेल्या काळात त्यांनी कुणाला भेटायचेही टाळले होते. अभिजीत त्यांच्या घरी गेला. “गुरुजी, ओळखलं का मला? मी अभिजीत, तुमचा जुना विद्यार्थी.”
दिनकररावांनी डोळे वर करून पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची रिकामी नजर होती. “अभिजीत? तू इथे?”
“हो गुरुजी, मी आलोय तुमच्यासाठी. मला कळलं तुमच्यासोबत काय झालं ते. गुरुजी, यात तुमची काहीच चूक नाही. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका,” अभिजीतने शांतपणे सांगितले.
दिनकररावांनी डोळे मिटून घेतले. “नाही रे बाळा, मीच मूर्ख ठरलो. इतकी वर्षं मी लोकांना शहाणपणा शिकवला आणि स्वतःच फसलो. माझ्या विद्यार्थ्यांनी, अख्ख्या गावाने माझ्यावर विश्वास ठेवला, पण मीच…” त्यांचा आवाज भरून आला.
अभिजीतने त्यांचा हात हातात घेतला आणि समजावू लागला, “गुरुजी, सायबर गुन्हेगार खूप चाणाक्ष असतात. त्यांची फसवणुकीची पद्धत रोज बदलत असते. ते फक्त तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत, तर माणसांच्या भावनांचा, त्यांच्या भीतीचा, त्यांच्या गरजांचा आणि त्यांच्या विश्वासाचा फायदा घेतात. त्यांनी तुम्हाला बँकेच्या खात्याची भीती दाखवली, तातडीने कारवाई करण्याची सक्ती केली, ज्यामुळे तुम्हाला विचार करायला वेळच मिळाला नाही. याला ‘सोशल इंजिनिअरिंग’ म्हणतात. यात समोरची व्यक्ती इतकी खरी वाटते की, कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवेल.”
तो पुढे म्हणाला, “आजकाल ते फक्त अनोळखी फोन करत नाहीत, तर कधी बँकेतून मेसेज आल्यासारखं दिसतं, कधी सरकारी योजनेचं आमिष दाखवतात, तर कधी तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने मेसेज करतात. ते तुमच्या फोनवर ‘रिमोट ॲक्सेस ॲप्स’ (Remote Access Apps) डाउनलोड करून घेतात, ज्यामुळे त्यांना तुमच्या फोनचा पूर्ण ताबा मिळतो. तुम्ही दिलेला ओटीपी त्यांना दिसतो, आणि त्यांना तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये प्रवेश मिळतो. हे लोक इतके प्रशिक्षित असतात की, ते मोठ्या मोठ्या कंपन्यांतील सायबर सुरक्षा तज्ज्ञांनाही फसवायचा प्रयत्न करतात. तुम्ही तर एक एक सामान्य नागरिक आहात, यात तुमची काय चूक?”
अभिजीतने त्यांना काही उदाहरणे दिली, जिथे उच्चशिक्षित आणि सावध लोकही कसे फसले गेले होते. त्याने सांगितले की, सायबर गुन्हेगार हे नेहमीच नवीन ‘फिशिंग’ (Phishing) लिंक्स, ‘विशिंग’ (Vishing) कॉल्स आणि ‘स्मिशिंग’ (Smishing) मेसेजेस तयार करत असतात, जे ओळखणे सामान्य माणसाला खूप कठीण जाते. “गुरुजी, तुम्ही एकटे नाही. असे हजारो लोक रोज याला बळी पडतात. यात लाज वाटण्यासारखं काही नाही. आपल्याला फक्त सावध राहायचं आहे आणि जर असं काही घडलं तर एकमेकांना समजून घ्यायचं आहे. तुम्ही स्वतःला दोष देणे थांबवा. तुम्ही आजही आमच्यासाठी तेच ज्ञानी दिनकरराव आहात, ज्यांनी आम्हाला जगण्याची दिशा दिली.”
अभिजीतचे बोलणे ऐकून दिनकरराव थोडेसे सावरले. त्यांच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. त्यांना जाणवलं की, ही त्यांची चूक नव्हती, तर गुन्हेगारांची चलाखी होती. अभिजीतचे बोलणे ऐकून दिनकरराव थोडेसे सावरले. त्यांच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. गेले अनेक दिवस त्यांना जो पश्चात्ताप आणि अपराधीपणा खात होता, तो आता थोडासा दूर झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी एक शांत भाव दिसला. त्या शांततेत एक प्रकारची स्वीकारार्हता होती, एक नव्या सुरुवात करण्याची तयारी होती. हा केवळ पैशांचा प्रश्न नव्हता, तर त्यांच्या आत्मविश्वासाला बसलेला एक मोठा धक्का होता. तो आत्मविश्वास परत मिळवण्याची पहिली पायरी आज त्यांनी टाकली होती.
संदेश: सायबर फसवणूक कुणासोबतही होऊ शकते…
दिनकररावांच्या या कथेतून आपल्याला हेच शिकायचं आहे की, सायबर फसवणूक कुणासोबतही होऊ शकते. ती व्यक्ती कितीही हुशार, अनुभवी किंवा सावध असली तरी. सायबर गुन्हेगार खूप प्रशिक्षित असतात आणि ते लोकांच्या भावनांचा, त्यांच्या गरजांचा, त्यांच्या भीतीचा आणि त्यांच्या विश्वासाचा फायदा घेतात. ते रोज नवनवीन युक्त्या वापरतात, ज्यांना ओळखणे सामान्य माणसाला खूप कठीण जाते. आज सायबर हल्लेखोर अत्यंत चलाख झाले आहेत. ते नवनवीन युक्त्या वापरून लोकांना जाळ्यात ओढतात. कधी लॉटरीचे आमिष, कधी नोकरीचे प्रलोभन, तर कधी बँकेतून बोलत असल्याचे भासवून ते लोकांना गंडा घालतात. त्यांची पद्धत इतकी सूक्ष्म असते की, सामान्य माणूस सहज त्यांच्या जाळ्यात अडकतो. सायबर साक्षरतेचा अभाव आणि डिजिटल व्यवहारांची अपुरी माहिती यामुळे अनेकजण बळी पडतात.
त्यामुळे, जर आपल्या आजूबाजूला कुणी सायबर फसवणुकीचा बळी पडलं असेल, तर त्यांना सहानुभूती द्या. त्यांना दोष देऊ नका, त्यांच्याकडे तुच्छ नजरेने पाहू नका. कारण, उद्या कदाचित ती वेळ आपल्यावरही येऊ शकते. “’तूच मूर्ख असशील, म्हणून फसवला गेलास’ किंवा ‘तूच बेसावध राहिला असशील’ अशा प्रकारची विधाने त्यांच्या आत्मविश्वासाला आणखी तडा देतात. अशा परिस्थितीत, त्यांना मानसिक आधाराची नितांत गरज असते. फसवणूक फक्त पैशांची नसते, तर ती विश्वासाची, सुरक्षिततेची आणि आत्मसन्मानाची असते. या अनुभवातून गेलेल्या व्यक्तीला पुन्हा सामान्य जीवनात परत येण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.
मायाजाल हे जगाचे, कुणा न कळे अंत।
क्षणातफसवणूक घडे, बुद्धीसी पडे भ्रांत ।।
न हसावे तयासी, जो बळी झाला।
उद्या कदाचित, तोच मार्ग आपणासी आला।।