आशुतोष ब्लॉग

मराठी शाळेचा ‘परंतु’

मराठी शाळेचा 'परंतु'

आज ‘क्रांतीज्योती विद्यालय’ हा मराठी चित्रपट पाहिला आणि जणू मराठी अस्मितेच्या नसा सळसळल्या.

मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी, इथे माझी पोस्ट वाचणारे देखील बहुतेक मराठी माध्यमाचेच विद्यार्थी. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या मराठी शाळेला भावनिक रित्या कायमचा जोडलेला.

“ही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा”

प्र. के. अत्रेंची कविता आहे तसे आपण आपल्या शाळेला, आपल्या आईच्या स्थानी पाहत आलेलो आहोत. मराठी शाळेत शिकलेल्या पिढीचे यावर दुमत नसणार. आपली शाळा आपल्याला आवडते. आपण आज जे काही घडलो ते केवळ आणि केवळ आपल्या शाळेमुळे असेच आपण म्हणतो. आपण तिचे कायम ऋणी.

परंतु,

या मराठी शाळेच्या भाग्यात मात्र एक “परंतु” ग्रह सामावलेला. या चित्रपटाने त्या ‘परंतु’ ला वाचा फोडली आहे.

महाराष्ट्रात मराठी शाळांची पटसंख्या वेगाने कमी होते आहे हे सत्य म्हणजे ‘परंतु’.

पटसंख्या कमी झाली म्हणून वेगाने बंद होत चाललेल्या मराठी शाळा हा त्या शाळांच्या भाग्यातला ‘परंतु’.

मराठी शाळा बंद होत चालल्या म्हणजे अर्थात तिथे शिकवली जाणारी मराठी भाषा, मराठी संस्कृती, पुढच्या पिढीला दिली जाणार नाही ही त्या ‘परंतु’ ची निष्पत्ती.

या ‘परंतु’ मुळे हळू हळू करत, मराठी शाळा नावाची ही समाज-राष्ट्र घडवणारी ही व्यवस्था ऱ्हासाकडे चालल्याचे चित्र आहे.

या ‘परंतु’ मुळे, सकाळी प्रांगणात जमून गायली जाणारी बलसागर भारत होवो, सत्यम शिवम सुंदरा, खरा तो एकाची धर्म आणि पसायदानाची जागा आता “थँक यू गॉड” ने केव्हा घेतली हे कळणार देखील नाही.

या ‘परंतु’ मुळे न होवो पण एक काळ असा येऊ शकतो, वरती मी ती अत्रेंची कविता लिहिली ना, त्या कवितेला वाचक कुणी उरणार नाही.

आठ शतके आधी “माझा मराठीची बोलू कौतुके” पासून आपला इतिहास सांगणारी आपली माय मराठी भाषा, या एका ‘परंतु’ मागे पडत चाललेली दिसते.

१२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडाव्यात हा ‘परंतु’ आला कुठून? तो आला तुमच्या आमच्या कृतघ्न वृत्तीमुळे! मराठी शाळेचे बोट पकडून मोठे झालेलो आपण, आपली लेकरं मात्र इंग्लिश स्कुल मध्ये टाकली. आम्ही ज्या आईच्या कुशीत ज्ञानार्जन केले, त्याच मराठी शाळेला आज आपण कॉन्व्हेंटच्या दारात उभे केले.

हा तोच “परंतु” तो तुम्ही आम्ही उभा केला. आज आम्ही ऐटीत इंग्रजी बोलत असू, पण इंग्रजी बोलणाऱ्या जिभेला मराठी भाषेचाच घास लागलेला आहे, हे वास्तव आपण विसरलो.

मराठी शाळांच्या, मराठी संस्कृतीच्या भाग्यातला ‘परंतु’ ग्रह काढून टाकायचा असेल, तर आपल्या कृतघ्न वृत्तीला मूठमाती द्यावी लागेल. हा ‘परंतु’ दुसरा तिसरा कोणी नाही, तो आपणच उभा केलेला अस्मितेचा शत्रू आहे! ज्या मराठी शाळेने आम्हाला जगायला शिकवले, ज्या शाळेने ज्ञानज्योत पेटवली, त्याच शाळेला पुन्हा तिचे गौरवाचे स्थान मिळवून देणे, हीच आमची कर्तव्यपूर्ती आहे.

– आशुतोष

Exit mobile version