आशुतोष ब्लॉग

गोदावरीबाई टेके : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील रणरागिणीची शौर्यगाथा

गोदावरी बाई टेके – हे नाव ऐकल्याचे तुम्हाला स्मरते का? बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात हे नाव होतं, आता विस्मृतीत गेलं असेल कदाचित…

रझाकारांच्या अत्याचारात दबलेल्या मराठवाड्यातल्या अनेक वीरकथा अशाच विस्मृतीत गेलेल्या. स्वराज्य, स्वातंत्र्याकरिता इतिहासात लढाया झाल्या त्या सर्वांनीच रक्तपात पाहिला, आणि मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम त्याला काही अपवाद नव्हता. भारतीय स्वातंत्र्यानंतर १३ महिने रझाकारांच्या अत्याचारात होरपळत राहिलेल्या ह्या मराठवाड्याची मुक्ती संग्राम गाथा तशीच एका ज्वलंत अग्निकांडाची, त्यात बलिदान गेलेल्या हुतात्म्यांची, शूर वीरांची. रक्ताने माखलेला, दंगलींनी त्रासलेला, जाळपोळी – लुटी – अत्याचारांनी बरबटलेला मराठवाडा मुक्तिसंग्राम हा स्वातंत्र्याचा जिवंत यज्ञच.  मुक्तिसंग्रामाच्या यज्ञात आहुती गेलेली एक तळपती तलवार म्हणजे गोदावरीबाई टेके. 

आजच्या धाराशिव जिल्ह्यातील, भूम जवळील ‘ईट’ हे गाव. मुक्तिसंग्रामात आर्य समाजाच्या कार्याची धुरा सांभाळणारे किसनराव टेके यांच्या वीरपत्नी गोदावरीबाई. किसनराव टेके व त्यांचे पुत्र माधवराव टेके दोघेही सशस्त्र लढाईतले वाघ. ईट गाव आणि आजूबाजूच्या परिसरात रझाकारांवर जरब बसवण्यात किसनराव आघाडीवर होते. त्यांचे पुत्र माधवराव हे सरहद्दी वरील सशस्त्र कॅम्प मधून लढ्यात उतरले होते. किसनराव टेकेंची रझाकारांवर दहशत होती. गावातील लोकांना एकत्र करून रझाकारांवर नियंत्रण ठेवण्यात किसनरावांचे नेतृत्व होते. 

६ मे १९४८, रझाकारांनी गिधाडांसारखे किसनरावांच्या इट या लहानश्या गावावर झडप घातली. गावाभोवती फास आवळला आणि गावकरी भयभीत झाले.  रझाकारांच्या येण्याने गावात एकच हाहाकार माजला होता. रझाकारांचा  मुख्य उद्देश होता – किसनरावांना पकडणे. त्यांनी किसनरावांच्या घराला वेढा दिला. आणि एका अनपेक्षित क्षणी, निःशस्त्र असलेल्या त्या शूर वीराला रझाकारांच्या गोळीने वेधले आणि ते धारातीर्थी पडले. किसनरावांच्या हौतात्म्याने रझाकारांनी जणू विजयोत्सवच साजरा केला, त्यांच्या क्रूर हास्याने आसमंत दणाणून गेला.

आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे पाहताच गोदावरीबाई सुडाने पेटून उठल्या. पतीच्या निधनाचे दुःख न करता त्यांनी किसनरावांची बंदूक हाती घेतली. पतीच्या रक्ताने माखलेली भूमी पाहून गोदावरीबाईंच्या नसांमध्ये जणू क्रांतीचा अग्निस्रोत उसळला. दुःखाचा एकही अश्रू न गाळता, त्यांनी पतीची बंदूक हाती घेतली. क्रोधाग्नीने लालबुंद झालेल्या डोळ्यांनी, त्या रझाकारांवर तुटून पडल्या. गोदावरी बाईंच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्यांनी रझाकारांच्या छातीत धडकी भरवली. गोदावरीबाईंच्या अविचल पराक्रमापुढे रझाकारही थबकले. त्यांच्या गोळ्यांनी दोन रझाकारांना यमसदनी पाठवले, आणि बाकीचे भयाने पळू लागले. या रणरागिणीने दोन रझाकार उडवून आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेतला आणि ते पाहून पठाण, रझाकार पळू लागले. आपली हार होताना पाहून रझाकारांच्या समवेत आलेल्या कलेक्टर हैदरी ने आदेश दिला, रझाकारांनी त्यांच्या घराला चहूबाजूंनी आग लावली. अग्नीच्या ज्वाळांनी घर वेढले होते, जणू काही निजामाच्या अत्याचारांचा अग्नी त्यांना गिळंकृत करू पाहत होता. धुराचे लोट आकाशात काळ्या राक्षसासारखे थैमान घालत होते. आत, गोदावरीबाई, त्या धीरोदात्त वीरांगना, आगीच्या त्या रौद्र तांडवातही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिल्या. जणू काही रणरागिणीच! शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक ज्वालांशी त्या झुंजत होत्या, आपल्या प्राणांची आहुती देत त्यांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात आपले जीवन समर्पित केले.

ईट गावातील गोदावरीबाईंचे हे बलिदान म्हणजे मराठवाड्याच्या धगधगत्या स्वातंत्र्यसंग्रामाचे एक तेजस्वी स्फुल्लिंग. हे केवळ एका स्त्रीचे बलिदान नव्हते, तर तो मराठवाड्यातील प्रत्येक मावळ्याने आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या अग्निदिव्याचा एक अंश होता. रझाकारांच्या क्रूर अत्याचारांच्या काळोखात, निजामाच्या जुलमी जोखडातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी असंख्य अज्ञात वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

त्यांच्या धमन्यांतील रक्त म्हणजे केवळ रक्त नव्हते, तर ते मराठवाड्याच्या मातीचे स्फुर्तीगीत होते. त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबात स्वातंत्र्याची ज्योत तेवत होती. मराठवाडा, तेलंगणा, उत्तर कर्नाटकची इंच इंच जमीन, या शूरवीरांच्या धैर्याने, त्यागाच्या पवित्र रक्ताने माखली होती. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातूनच स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, आणि मराठवाड्याने निजामाच्या तावडीतून मुक्त होऊन आपला स्वाभिमानाचा झेंडा दिमाखात फडकावला. हा केवळ एक लढा नव्हता, तर तो मातृभूमीच्या सन्मानासाठी, तिच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या वीरांचा ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ होता. 

Exit mobile version