बाजूच्या लेनमधून जग सुसाट धावतंय, दिव्यांच्या लखलखाटात मागे वळूनही न बघता. मी मात्र माझ्या तिसऱ्या लेनचा कोपरा धरलाय…
संथ, स्थिर आणि स्वतःच्या लयीत!
आयुष्यही असंच जगायचं असतं ना? कोणाशीही स्पर्धा न करता, स्वतःचा रस्ता स्वतःच आखत.
खिडकीतून येणारी वाऱ्याची ती झुळूक,
ती जाणीव आहे स्वातंत्र्याची, मनसोक्त मुक्तछंदात स्वतःशीच साधलेल्या त्या मनमोकळ्या संवादाची…
हा महामार्ग म्हणजे जणू आपल्या आयुष्याचा आरसाच…
कधी दिव्यांनी नाहून निघालेले लखलखते बोगदे, तर कधी बोगदा संपताच पसरलेली अंधारी वाट. सुखाच्या प्रकाशात हुरळून जायचे नाही आणि दुःखाच्या अंधारात थांबायचे नाही, चालायचे मात्र आपल्याच गतीने…
रात्रीची नीरव शांतता, खिडकीत एक हात रेलून, दुसऱ्या हाती आयुष्याची स्टिअरिंगची सांभाळत, महामार्गावरच्या त्या शर्यतीत, तिसऱ्या लेनचा संयम स्वीकारून, भीमण्णांच्या स्वरात विरघळताना जाणवतंय,
हा प्रवास फक्त रस्त्यावरचा नाही, तर ‘स्वतःचा, स्वतःकडे’ जाण्याचा आहे!…
