चिवडा

स्वयंपाकघरात उजव्या हाताला कप्प्यांमध्ये सगळे डबे व्यवस्थित मांडून ठेवलेले, त्यात डोळ्याच्या समोर दिसणाऱ्या पाच डब्यांच्या ओळीत मधला डबा खूप खास आहे. त्या डब्याची ओळख चिवड्याचा डबा अशी! अर्थात त्यात चिवडा असायचा.

शाळेत असताना अन नंतर कॉलेज मध्ये असताना, हा चिवड्याचा डबा म्हणजे माझा अत्यंत आवडता, हवं तेव्हा, भूक लागली तर, काहीतरी खावंसं वाटलं तर, अगदी केव्हाही मी हा डबा अलगद उघडून त्यातून चिवडा घेऊन खाणार. कधी वाटीत, प्लेट मध्ये चमचा घेऊन व्यवस्थित खाणार , तर कधी लपून छपून तिथेच उभा राहून गुपचूप मूठभर तोंडात टाकणार. हा माझा नित्य क्रम, वेळ काळ काही बंधन नाही, अन चिवडा खाल्ला नाही असा दिवस क्वचितच उगवायचा.

जेवणा व्यतिरिक्त खायला काहीतरी घरात असावं म्हणून हा चिवडा आई करून ठेवायची. तो फार गोड नसायचा, फार तिखट सुद्धा नाही, त्याची आपली एक वेगळीच चव, अन ती चव कधी चुकली नाही. चिवडा म्हटलं की तीच चव जिभेवर रेंगाळते, दुसऱ्या कुठल्या चवीचा चिवडा असतो ही संकल्पनाच चुकीची आहे, कुणी दुसऱ्या चवीचा चिवडा बनवत असेल त्यांचा मी निषेध करायला तयार आहे.

तर, मी कधी कधी हा चिवडा अति खायचो. चिवडा खाल्ल्याने पोट भरलं तर नीट जेवायचो नाही, त्यावर आई चिडायची. मला त्याची इतकी सवय लागली की तो डबा हलवून मला अंदाज यायचा की आत चिवडा किती आहे. पण आई माझ्यावर ओरडताना म्हणायची, जास्त खात नको जाऊ, त्याने पोट दुखेल, चिवडा कडक असतो. आणि व्हायचं तेच होत गेलं, अधून मधून माझं पोट आखडायचं, दुखायचं. ही पोटदुखी चिवड्यानेच होते ह्यावर मी ठाम आहे, हवं तर ह्याला अंधश्रद्धा समजा.

आईने त्या पोट दुखण्याची भीती घातली होती, मी ती खरी समजू लागलो अन कॉलेज नंतर चिवडा खाणं कमी केलं,आता तर मी सोडून दिलं. मी चिवडा खात नाही, खाल्लं तर पोट दुखेल म्हणून. रात्रीतून त्या डब्यातला चिवडा हळूच कमी होण्याचे प्रकार बंद झाले.

पण आजकाल तो डबा रिकामाच असतो, काहीतरी दुसरंच भरलेलं असतं त्यात. आता त्या डब्याला उघडून मी त्यातला चिवडा खात नाही. तो डबा त्याची ओळख फक्त नावालाच ठेऊन आहे, आजही त्याला मी चिवड्याचा डबा म्हणतो पण त्यात चिवडा नसतो. मी कुठून तरी आणून त्यात चिवडा ठेवेल पण त्याला मला हवी तीच चव असणार नाही. काळ बदलला तसं सगळ्याच गोष्टींचं महत्व कमी होतं, त्या डब्याच तसंच झालंय. ना त्यातून मी चिवडा खातो न आई त्यात चिवडा भरून ठेवते. त्याने पूर्वी मी चिवड्याचा डबा असा गर्व केला असेल तर तो आता त्याला सोडावा लागेल.

आपणही असंच करायला हवं, आपल्याला असलेल्या ओळखीचा आपण गर्व करायला नको, एक दिवस ती ओळख फक्त नावापुरती होईल.

हा चिवडा कायम आठवणीत आहे, तो डबा कायम आठवणीत राहील. चिवड्याची चव जणू आईने पेटंट करून ठेवली होती, ती कुणालाही जमत नाही. ती चव नसलेला, दुसऱ्या कुणी बनवलेला चिवडा मी खाऊ शकत नाही, आणि खाल्ला तरी माझं पोट दुखेल.

7 Comments

Add a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.