आशुतोष ब्लॉग

आनंदवनभुवनीं

प्रभू श्रीराम वनवासाहून परत आले, त्यावेळी जनतेने गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले असा संदर्भ आहे. अगदी तसेच उद्या प्रभू श्रीरामांच्या स्वागताला जणू अवघी भारतभू सज्ज झाली आहे, केशरी भगव्या रंगात न्हाऊन निघाली आहे. सर्वत्र आनंदी आनंद! आनंदवन भुवनीची अनुभूती देऊन जात आहे!!

मंगळे वाजती वाद्यें । माहांगणासमागमे । आरंभी चालीला पुढें । आनंदवनभुवनीं ।।

देवालयें दीपमाळा । रंगमाळा बहुविधा । पुजिला देव देवांचा । आनंदवनभुवनीं ।।

संतश्रेष्ठ रामदासांचे हे काव्य. या पूर्वी असा सोहळा झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक!! अवघी प्रजा सुखावली, सर्वत्र धर्माचे राज्य प्रस्थापिले! त्यासारखाच शतकांत एकदा होणारा हा राम मंदिर पुनर्स्थापना सोहळा अनुभवायला मिळणे हे आपले सौभाग्यच…!

सकारात्मक ऊर्जेची एक प्रचंड मोठी लाट यावी तसे वातावरण उत्साहित, ऊर्जेने भरलेले, यत्र – तत्र – सर्वत्र केवळ हर्ष-प्रफुल्लित झालेले भासत आहे. कदाचित हीच प्रभू श्रीरामांच्या आगमनाची नांदी म्हणावयास हरकत नाही.

सर्वत्र दिसणारा आनंद, प्रत्येकाच्या मनात असलेली या दिवशीची उत्सुकता, श्रीरामांची ओढ, बघावे तिकडे सुरु असलेले रामांचे गुणगान, भक्ती हे सर्वकाही जणू अवघा रंग एक झाला. आज पाहता जो तो रामाच्या भक्तीत लीन झाला आहे!

संत रामदासांच्या आनंदवनभुवनी चा प्रत्यय आता पदोपदी येत आहे. हेच का ते धर्माचे राज्य, हेच का ते राम राज्य!

बुडाले सर्व ही पापी । हिंदुस्‍थान बळावलें । अभक्तांचा क्षयो जाला । आनंदवनभुवनीं ।।

Exit mobile version