सावधान! राम मंदिर सोहळा आणि सायबर गुन्हेगारांची लबाडी

रामजन्मभूमी अयोध्या येथील राम मंदिर लोकार्पण आणि प्रभू श्रीराम यांचे होणारे आगमन हा या युगातून एकदा होणारा सोहळा अनुभवण्याची तयारी आपण करत आहोत. भारतराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक घरात एक आगळावेगळा उत्साह दिसतो आहे. जो तो आपापल्या परीने या सोहळ्याच्या तयारीला लागला आहे. हा अभूतपूर्व सोहळा आणि लोकांचा उत्साह या दोन्हींचा फायदा उचलत सायबर गुन्हेगार देखील सक्रिय झाले झाले आहेत. सायबर गुन्हेगारांची खासियत असते. जिथे गर्दी तिथे हॅकर्स दर्दी असे म्हणायला हरकत नाही. राम मंदिर स्थापना सारख्या लोकप्रिय घटनेचा गैरफायदा उचलणार नाहीत ते हॅकर्स कसले. हीच संधी साधून सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत आणि आता आंतरजालावर अनेक फ्रॉड & स्कॅम पसरवले आहेत. यातून आपल्या सारख्या सामान्य भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.

काय आहेत राम मंदिराशी संबंधित सायबर गुन्हे

जसे जसे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा जवळ येत आहे तसे अनेक क्लृप्त्या लढवून सायबर गुन्हेगारांनी आपली लबाडी दाखवणे सुरु केले आहे. सायबर गुन्हेगारांची एक मोडस ऑपरेंडी (कार्यपद्धती) कायम असते. त्यांना लोकप्रिय गोष्टी, जिथे लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळेल अशा संधी हव्या असतात. अशातून त्यांना जास्तीतजास्त लोकांपर्यंत आपला स्कॅम पोचवता येतो. राममंदिर स्थापना सोहळ्याशी निगडित अशा काही बाबी हेरून सायबर गुन्हेगारांनी लोकांना खोटी आश्वासने देऊन, प्रलोभने दाखवून लुबाडण्याचे उद्योग सुरु केले आहेत आणि त्यांपैकीच काही फसवणुकीची माहिती मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.

१. राम मंदिर वर्गणी स्कॅम

जसे प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे निर्माण काय सुरु झाले, भक्तांनी कणाकणाने राम मंदिर निर्माण कार्यात हातभार लावणे सुरु केले. बघता बघता आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला. सायबर लबाडांनी इथेच संधी शोधली. मंदिर निर्माण कार्यात आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्या भक्तांना ऑनलाईन फसवण्याचा प्रकार सुरु केला. सायबर लबाडांनी फेसबुक, ट्विटर सारख्या समाज माध्यमांवरून मंदिर व्यवस्थापनाच्या नावाने खोटी खाती उघडून त्यावरून मदतीचे आवाहन केले. या बहुतांश पोस्ट खाली क्यूआर कोड लावून थेट मदत करण्याचे आवाहन केले. हे क्यूआर कोड या सायबर गुन्हेगारांच्या बँक खात्यांचे आणि युपीआय खात्यांचे होते. हे क्यूआर कोड वापरून पैसे पाठवले तर ते मंदिर निर्माण समितीला न जाता या सायबर लबाडांच्या खात्यात जमा होत आहेत.

हा स्कॅम आता, मंदिर लोकार्पण दोन दिवसांवर आलेले असताना देखील सुरु आहे. त्यामुळे मंदिराला देणगी देत असताना आपण अधिकृत ठिकाणीच देणगी जमा करत आहोत ना याची खात्री करायला हवी.

सावधान! राम मंदिर सोहळा आणि सायबर गुन्हेगारांची लबाडी 1

२. राम मंदिर सोहळ्याचे फेक अनुप्रयोग (ॲप)

आपल्यापैकी प्रत्येकालाच राम मंदिर स्थापना सोहळ्याची कमालीची उत्सुकता आहे. प्रत्येकजण या सोहळ्याचा साक्षीदार होऊ इच्छितो. अशातच तुमच्या व्हाट्सऍपवर एक मेसेज आला आणि त्यांनी तुम्हाला राम मंदिर सोहळ्याचे व्हीआयपी पास देण्याचे आमिष दाखवले तर? तर अशा मेसेजवर अजिबात विश्वास ठेऊ नका.

सायबर चोरट्यांनी अशी खोटी आमिषे दाखवणारे अनेक मेसेज ज्यांसोबत एक अनुप्रयोग (ॲप) डाउनलोड करण्यासाठी दिला आहे. असे अनेक मेसेज सध्या पसरवले गेले असून अनेक जण नजरचुकीने ते इतरांना पाठवत आहेत. या अनुप्रयोगांमधून सायबर चोर तुमच्या फोन मध्ये व्हायरस पसरवत आहे. या द्वारे तुमची फोनमधील माहिती चोरणे, बँकेसंबंधित अनुप्रयोग हॅक करणे, ओटीपी मेसेज कॉपी करणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे मंदिर सोहळ्याशी संबंधित कुठलेही अनुप्रयोग इन्स्टॉल न केलेले उत्तम.

सावधान! राम मंदिर सोहळा आणि सायबर गुन्हेगारांची लबाडी 2

३. राम मंदिर लाडू स्कॅम

एखादी फसवणूक योजना आखण्याचा बाबतीत मला सायबर गुन्हेगारांच्या कल्पकतेची दाद द्यावी वाटते. राम मंदिर स्थापना, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या सोबतच सायबर गुन्हेगार वाटत आहेत प्रसादाचे लाडू. आपण सारासार विचार केला तर जो प्राणप्रतिष्ठा सोहळा अजून झालेला नाही त्याच्या प्रसादाचे लाडू का वितरित केले जात असावेत. पण सायबर गुन्हेगारांनी ही शक्कल लढवून अमेझॉन सारख्या विक्री मंचावर खोटी खाती बनवून प्रसादाचे लाडू विक्री करणे सुरु केले आहे. हे लाडू तुम्हाला विकत घ्यावे लागतात. मात्र तुम्ही देणगी देऊन घेतलेले लाडू कधीही तुमच्या पर्यंत पोचवले जात नाहीत.

त्यामुळे ऑनलाईन प्रसादाचे लाडू ऑर्डर करण्याआधी एकदा विचार केलेला बरा.

सावधान! राम मंदिर सोहळा आणि सायबर गुन्हेगारांची लबाडी 3
राम मंदिर प्रसाद लाडू स्कॅम

४. राम मंदिर समितीची बनावट संकेतस्थळे

कुठल्याही नवीन गोष्टीची माहिती घेण्यासाठी आपण त्याची इंटरनेटवर माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. राम मंदिराची माहिती घेण्यासाठी गुगल सर्च केला तर अनेकांना राम मंदिर समितीची बनावट संकेतस्थळे दिसत आहेत. मंदिर समितीची असावीत इतकी हुबेहूब संकेतस्थळे बनवून त्याद्वारे भक्तांकडून देणगी गोळा करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगार करत आहेत. अगदी खरी खुरी वाटावीत अशी संकेतस्थळे बनवून त्यावरून आमिषे देणे आणि आर्थिक फसवणूक करणे अत्यंत सोपे आहे.

ही काही उदाहरणे आहेत,ज्या द्वारे सायबर गुन्हेगार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा गैरफायदा घेत सामान्य जनतेची फसवणूक करत आहेत. या सारखे एखादे फसवणुकीचे प्रकरण आपणही बघितले वा ऐकले असेल तर प्रतिक्रियेद्वारे ते तुम्ही लिहू शकता. या लेखातील माहिती करिता वापरलेली चित्रे AntiHak यांच्या ब्लॉग वरून घेतली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.