म्हणून तर तिला वारी म्हणतात

परवा रात्री भूक लागली, अचानक काहीतरी खावंसं वाटलं. पटकन ॲप उघडलं, ऑर्डर केली. दहा मिनिटांत ‘डिलिव्हरी’.

पण जेव्हा १२ मिनिटं झाली, तेव्हा माझा जीव वर-खाली व्हायला लागला. मी अस्वस्थ होऊन मोबाईलकडे पाहत होतो. नकाशावरचा तो छोटा ठिपका हलत का नाही, म्हणून माझी चिडचिड सुरू झाली होती.

आणि त्याच वेळी टीव्हीवर बातमी चालू होती. पालख्या पंढरपूरच्या वाटेवर आहेत. बाहेर कोसळणारा पाऊस, पायांखाली चिखलाचा रस्ता, खांद्यावर भगवी पताका आणि मुखात विठ्ठलाचं नाव. त्या चिखलात लाखो पावलं एका लयीत, एका तालात पुढे पडत होती. एकवीस दिवस. अडीचशे किलोमीटर.

मला माझंच हसू आलं. दोन मिनिटांच्या उशिराने आपला जीव वर-खाली होतो, आणि ही माणसं तीन आठवडे चालत जातात.!

खरं तर एसटीने पंढरपूर काही तासांत गाठता येतं. वारकऱ्यांना हे माहीत नाही असं थोडीच आहे? तरी ते चालणंच निवडतात. दरवर्षी. पिढ्यानपिढ्या. का?

कारण वारकऱ्यासाठी पंढरपूर हे नुसतं नकाशावरचं ठिकाण आहे. वारी हीच त्याची भक्ती आहे. चालणं हे साधन नाही, तेच साध्य आहे.

टाळ-मृदंगाचा ताल ऐका कधी. तो कधीच घाई करत नाही. अभंगाची एक ओळ संपते, मग दुसरी सुरू होते. पाऊस पडतो, थांबतो, पुन्हा पडतो. पावलं मात्र चालत राहतात. वारीला घड्याळ नसतं, फक्त दिशा असते.

आणि आपण? आपल्याला प्रत्येक गोष्ट ‘इन्स्टंट’ हवी आहे. जेवण दहा मिनिटांत दारात येतं. तीस सेकंदांच्या ‘रील’मध्ये करमणूक आटोपते. प्रश्न विचारायचा अवकाश, एआय क्षणार्धात उत्तर हातात ठेवतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशी आपली अवस्था झालीये.

पण गंमत बघा. एवढं सगळं झटपट हातात पडूनही आपले चेहरे नेहमी तणावात असतात. आणि तिकडे भर पावसात चिखल तुडवणाऱ्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र विठ्ठल भेटायच्या आधीच एक अथांग आनंद दिसतो.

याचं कारण एकच असावं. आयुष्यातल्या काही गोष्टींना ‘फास्ट फॉरवर्ड’ नसतो. थेंबे थेंबे तळे साचे, तसा विश्वास थेंबाथेंबाने कमावावा लागतो. नातं रोज पाणी घातल्यासारखं जपावं लागतं. कौशल्य वर्षांनी मुरतं, लोणच्यासारखं. आणि श्रद्धा? ती चालत चालतच विठ्ठलापर्यंत पोहोचते.

ज्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास, तो विठ्ठलही बघा कसा आहे. अठ्ठावीस युगं विटेवर उभा आहे, कमरेवर हात ठेवून. त्यालाही घाई नाही. तो वाट पाहतो.

वारी दरवर्षी नेमकं हेच सांगायला येते. जे खरं मोलाचं आहे, ते वेळ मागतं. घाम मागतं. संयमाचं एक एक पाऊल मागतं.

एवढ्यात दारावरची बेल वाजली. माझी ऑर्डर आली होती. बरोबर बारा मिनिटांत.

पिशवी हातात घेताना मनात विचार आला. उद्या जगातली प्रत्येक गोष्ट अशी दारापर्यंत येईल कदाचित. विठ्ठल मात्र येणार नाही.

विठ्ठल ‘ऑर्डर’ करता येत नाही. त्याच्यापर्यंत चालतच जावं लागतं.

म्हणून तर तिला वारी म्हणतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत