वारा झुळुकेसारखा अंगावर आला तर आल्हाददायक वाटतो, भरभर करत वावटळीसारखा येणारा वारा विध्वंसकच.
वर लिहिलेल्या त्या दोन ओळींपुढे मी जर “व. पु. काळे” असं लिहिलं तर ही पोस्ट आत्ता वायरल होईल. वपुंच्या चाहत्यांना एव्हाना तो विचार वपुंच्या कुठल्यातरी पुस्तकात वाचल्यासारखा वाटत असेलही. पण मी सांगतो, हा विचार वपुंचा नाही, माझाच आहे, वपुंच्या तोंडी घातलेला. थोडक्यात काय, तर वपु या नावाला इतकं वजन आहे की तुम्ही त्यांचं ‘ब्रँडनेम’ वापरलं तर तुमचं दुकान चालणारच.
जसं लेखकांचं, तसंच मोठाल्या ब्रँडचं, सेलेब्रिटींचं, हिरो-हिरोईन, नेतेमंडळींचं. बिसलेरीच्या नावाखाली बिलसेरी, बिसली अशा कित्येक नावांनी अगदी हुबेहूब दिसणाऱ्या पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. एकाच बाजारात एकाच नावाची अनेक दुकानं शेजारी शेजारी उभी राहतात. एवढंच काय, निवडणुकीच्या खेळात एकाच नावाचे अनेक उमेदवार अचानक उगवतात की!
हे सगळं का होतं? कारण ते नाव. त्या नावात एक अधिकारवाणी आहे, विश्वास आहे, खात्री आहे. आणि म्हणूनच ते नाव, मग ते दुकानाचं असो वा व्यक्तीचं, नुसतं वापरलं तरी गिऱ्हाईक आपोआप चालत येतं.
पण हे विसरून चालणार नाही की ते नाव एका रात्रीत उभं राहिलेलं नसतं. वपुंनी शब्दाशब्दांतून, बिसलेरीने थेंबाथेंबांतून ते वर्षानुवर्षं कमावलेलं असतं. नक्कल करणाऱ्याला नाव चोरता येतं, नावामागची तपश्चर्या नाही.
म्हणून त्या दोन ओळींखाली मी वपुंचं नाव लिहिणार नाही. लिहीन माझंच. दुकान हळू चालेल कदाचित, पण चालेल ते माझ्या नावावर.
आणि हेच तुम्हालाही सांगावंसं वाटतं. नोकरी असो, व्यवसाय असो वा चार माणसांतली ओळख, तुम्ही दिलेला शब्द, तुम्ही केलेलं काम, तुम्ही पाळलेली वेळ… या सगळ्यांतून तुमचं नाव रोज थोडं थोडं घडत असतं. कुणाचं तरी नाव उसनं घेऊन दुकान थाटता येईल, पण विश्वास उसना मिळत नाही.
समर्थ रामदास सांगून गेलेत “मरावे परी कीर्तिरूपे उरावे.” ही कीर्ती म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही, तुमचं नाव.
कारण शेवटी तुमचं नाव हाच तुमचा ब्रँड.!
