भीमण्णा – भीमसेन जोशी

पहाटे आईने सुरु रेडीओ सुरु करावा, त्यावर आकाशवाणीची धून अन वंदे मातरम् झाल्यावर एक एक एक उद्घोषणा व्हाव्यात. आजही कानात ती उद्घोषणा घुमते, “सादर करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम – स्वरांजली”. ह्या स्वरांजली कार्यक्रमाने मला एक वेगळीच देण दिली आहे. ह्या स्वरांजली मध्ये एका गायकाचे नाव दर दिवसाआड ऐकू येत असे, ते म्हणजे पंडित भीमसेन जोशी!

ह्या भीमसेन जोशी नावाच्या आवाजाची वेगळीच जादू होती. कारण हा आवाज काही इतर गायक मंडळीं सारखा हलका, कोमल वगैरे नव्हता. हा अगदी भारदस्त, पहाडी आवाज असलेला गायक. परंतु आवाज कितीही भारदस्त असला तरी त्यातला गोडवा कधी लपून राहू नये. कधी आणि का पंडित भीमसेन जोशींचे अभंग ऐकावेसे वाटू लागू लागले ह्या प्रश्नाचे उत्तर आजही माझ्याकडे नाही. मात्र नकळत पंडित भीमसेन जोशींच्या अभंगवाणीचा लळा लागला अन तो आजही कायम आहे.

विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग सांगून आपल्या संतश्रेष्ठींनी उपदेशपर अनेक गीतमय रचना केल्या. ह्या थोर संतांच्या शब्दांना आपल्या ‘वाणी’ने कुणी ‘अभंग’ बनवले आहे तर ते भीमण्णानी! बालभारतीने दरवर्षी पुस्तकातून तुकोबा- ज्ञानोबा,एकनाथ,जनाबाईंची ओळख आम्हाला करून दिलीच मात्र त्यांना स्वररूपाने जिवंत करून आमच्या मनांत पोचवण्याची जबाबदारी जणू भीमसेन जोशींनी उचलली होती. केवळ शब्दांना आपल्या भारदस्त पण गोड स्वरांचा साज चढवून नव्हे, त्या अभंगात अवघा जीव ओतून त्यांना जिवंत करण्याची ही कला न्यारीच.

भीमण्णा म्हणजे जादुगार असावेत,किंवा त्यांच्याकडे गायकीचा परीस तरी असावा. त्यांच्या आवाजाचा स्पर्श व्हावा अन तो शेकडो वर्ष जुना अभंग तुकोबांसह साक्षात समोर उभा ठाकावा. राहुल म्हणतो तसं ‘काही केल्या तुझे मन पालिटेना’ ज्या नजाकतीने भीमण्णा म्हणाले आहेत,इथे कोण आहे ज्याला हे ऐकून पाझर फुटणार नाही? असे एक न अनेक, बहुदा प्रत्येकच अभंगाला भीमण्णांनी आपल्या नजाकतीने जिवंतपणा दिला. भीमण्णांनी ‘विठ्ठल गीतीं गावा’, अन गाता गाता तो ऐकणाऱ्याच्याही ‘चित्ती गोड लागावा’. सावळ्या सुंदर मनोहर रूपाचे गुणगान गाताना ‘तुझे नाम गोड पांडुरंगा’ मधून तो इतका गोड झाला आहे, की न जाणो त्या रेडीओ जवळ काळ्या मुंग्यांचा घोळका पडावा.

भीमण्णांच्या आवाजाने कधी रवी-शशी कळा थोपलेला, राजस सुकुमार असा तो मदनाचा पुतळा साक्षात समोर उभा केला तर तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल मधून नामदेवाचा हरवलेला विठ्ठल शोधून दिला. तो ही इतका सहज गायला आहे, जणू आपण गाव धुंडाळत असताना विठ्ठल हा इथे बाजूला बसलेला दिसावा.

मराठी मधून भीमसेन जोशींनी विठ्ठलाला साकडे घालत प्रसन्न केलेच,तिथे कन्नड भाषेतील पुरंदरादासांच्या भजनांनाही आवाजाचा परीसस्पर्श करवला. इकडे भीमण्णांनी ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ अशी आर्त साद घालावी ती ऐकून शेवटी तूप साखरेचा नैवेद्य घेण्यासाठी शुक्रवारी दारात लक्ष्मी हजर व्हावी इतकं हे सगळं सहज वाटतं.

पंडित भीमसेन जोशी म्हणजे अभंगवाणी इतका संकुचित अर्थ लावणारा मी. मुळात भीमण्णांची स्वर-संपदा कैक पटीने मोठी, पण माझ्यासारखा पामर त्यांच्या अभंगाच्या नादात आंधळे होऊन त्या पलीकडे भीमसेन जोशींना पाहू शकत नाही. भीमण्णांनी केवळ अभंग जिवंत केले असे नव्हे, न भेटणाऱ्या मैत्रिणीसाठी व्याकूळ झालेल्या प्रियकराचे ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गीत ऐकून आपणही उगीचच भरदिवसा पहाटेसमयी मंद होत चाललेल्या तारकांचा भास करून घ्यावा. कधी दूरदर्शन वर ‘मिलें सूर मेरां तुम्हांरां’ गाताना भीमसेनजी दिसावेत अन आनंद व्हावा.

अशा ह्या स्वरभास्करा बद्दल लिहावे तेवढे कमी, कळत नकळत भीमण्णांचा आवाज मनाच्या कोपऱ्यात अभंगवाणी रूपानेच का होईना पण चिरकाल कोरल्या गेल्या आहे. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, तसे भीमसेन जोशींच्या आवाजाशी मैत्री झालेल्यास वेगळ्या एका आनंदाचा लाभ होतो अशी भाबडी समजूत मी घालून घेतली आहे. भीमण्णांनी अभंगांतून विठोबाला आपल्या पुढ्यात उभे केलेच आहे तर त्यासमोर लोटांगण घालून मागणे मागावे ‘हेंची घडों मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरि नाही दुजें’

1 Comment

  1. Varsha viprasays:

    आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर http://www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.