डिजिटल युगातली सरस्वती

आज वसंत पंचमी.

आपण सरस्वती मातेला बहुतेक वेळा पुस्तक, वीणा आणि शांततेपुरतंच मर्यादित करतो. सरस्वतीचे पूजन फक्त विद्यार्थ्यांनी, परीक्षा काळापुरतेच करायचे असा पायंडा आहे.

आधुनिक जग हे तंत्रज्ञान, माहितीचं – डेटाचे जग आहे, आणि तिथेही सरस्वती मातेची आराधना असणे अगत्याचे आहे. एका क्लिकवर जगातील सर्व ज्ञान उपलब्ध आहे, हातातील मोबाईल हेच एक ग्रंथालय आहे, अशा या माहितीच्या महासागरात देवी सरस्वतीचे महत्त्व कमी झाले आहे का? तर नाही, उलट ते अधिक वाढले आहे!

देवी सरस्वती ही जशी विद्येची देवता आहे, तशीच ती ज्ञान, प्रज्ञा, सद्सद्विवेकबुद्धी, सृजनशीलता, निर्मिती, कल्पकता, चातुर्य, कुशाग्रता, कौशल्य यांचीही देवता.

आज पण कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), सांख्यिकी शास्त्र (Data Science) च्या वल्गना करतो, पण त्यातून मानवाच्या कल्याणासाठी काहीतरी नवीन निर्माण करणे, हीच खरी प्रतिभा. हाच तो सरस्वतीच्या आधुनिक वीणेचा झंकार आहे, जो तंत्रज्ञानाला जिवंत करतो.

इंटरनेट आपल्याला माहिती देते, पण त्या माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे शहाणपणात (Wisdom) रूपांतर करण्यासाठी आपल्याला शारदेच्या आशीर्वादाची गरज असते. यंत्र मानवासारखे काम करू शकेल, पण मानवासारखा विचार, विवेक आणि संवेदना केवळ ही कलेची देवताच देऊ शकते.

तंत्रज्ञान वेग देतं, पण त्या वेगाला दिशा देण्याचं काम ज्ञान करतं.

आणि ती दिशा देणारी शक्ती म्हणजे माता सरस्वती.

आजची सरस्वती माता  फक्त वीणेच्या तारांवरच नाही,

ती कळफलकाच्या कळांतून, अनुप्रयोगांच्या कोड मधून आणि त्यायोगे  विचारांच्या स्पष्टतेमध्ये वसलेली आहे.

म्हणूनच, आजच्या या डिजिटल युगात लॅपटॉप उघडण्यापूर्वी मनातील विचारांची शुद्धता जपणे, तंत्रज्ञानातून वाहणारी सृजनशीलता, विवेक, सुबुद्धी जागृत ठेवणे हीच खरी सरस्वती पूजा आहे.

या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *