मामाची बाग

आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या मनावर एक ठसा उमटवून जातात. बकुळीच्या फुलांचा सुगंध कसा बराच काळ दरवळत राहतो तशीच काही माणसं, त्यांचे स्वभाव, त्यांची शैली, खासियत यांची छाप आपल्यावर कुठेतरी पडते आणि त्यांच्या सहवासाने आपले आयुष्य उजळून जाते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक व्यक्तींची अशी काही एक प्रतिमा आपण घेऊन जगत असतो. त्या व्यक्तीचे नाव ऐकताच पहिले समोर चित्र दिसते तीच त्याची ओळख असे म्हणायला हरकत नाही.

असेच माझ्या मामाचे एक सुंदर चित्र मी माझ्या मनात कोरलेले आहे. कै. श्री.जयंत पोतदार, म्हणजे माझा मामा! माझे मामा न लिहिता माझा मामा लिहितोय कारण या मामाचा स्वभाव कायम एखाद्या मित्रासारखा होता, तो कधीच मला वयाने खूप मोठा असा वाटला नाही. तुमचा आमचा सगळ्यांचा मामा हा आयुष्यातल्या पहिल्या मित्रासारखा असतो यावर कुणी विरोध करणार नाहीच.!

माझ्या मामाची आठवण आली तर एक गोष्ट आठवते ती म्हणजे त्याची बाग. मामाला बागकामाची प्रचंड आवड, हे आमच्या घरातच नाही तर त्याची ज्यांच्याशी ओळख होती त्या प्रत्येकालाच हा छंद पक्का ठाऊक असणार. त्याचं झाडांवर, बगीच्यांवर प्रचंड प्रेम. घराच्या आजूबाजूला बहरलेली सुंदर बाग हे मामाच्या घराचे वैशिष्ट्य. मामाने त्याच्या घराच्या चारही बाजूंना विविध प्रकारची झाडं लावून त्याची बाग सुंदर सजवली. भरपूर प्रकारची फुलं, पेरू, चिकू सारखी फळं, वेली, बोन्साय, आयुर्वेदिक झाडं अशी भरगच्च बाग!

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे राहायला गेलो की त्या बागेला पाणी घालायचं काम असायचं. झाडांना पाणी देताना ते कसं द्यावं, पाईप असेल तर तो लांब धरू नये, बादली असेल तर ती हलकेच कशी उलटावी इथपासून ते कोणत्या झाडाला कोणतं खत घालायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची इथवर सगळ्या गोष्टी मामाकडून शिकल्या होत्या. मामाच्या गावाला जाताना झुकझुक अगीनगाडी मधली पळती झाडे तर सर्वांनीच पाहिली आहेत, पण बागेत मामाच्या प्रेमात लहानाची मोठी झालेली झाडं पाहण्याचं भाग्य मला लाभलं. या बागेच्या गमती मी शाळेत असतानाच्या असल्या तरी त्या आजही ताज्या फुलांसारख्या टवटवीत आहेत.

माझा मामा म्हणजे सतत नवनवीन गोष्टी करायचा ध्यास असलेला माणूस. बागेतली अचंबित करणारी गोष्ट त्याकडे पाहिली ती म्हणजे बोन्साय! बोन्साय म्हणजे खूप कुतूहलाचा विषय होता. एवढं मोठं वडाचं झाड कुंडी मध्ये लावलेलं बघताना नवल वाटायचं. भलेमोठे वाढणाऱ्या झाडाचे ते इवलेसे रूप पाहून आश्चर्य वाटायचं! वडाचं झाड माझ्या मामाने कुंडीत लावलं आहे हे शाळेत मित्रांना सांगताना पुरती गम्मत वाटायची. कुंडीत लावलेलं वडाचं खरंखुरं झाड दाखवतो म्हणून मी पैजा लावायचो, कुणीही मित्र यावर विश्वास ठेवायचे नाही.

गुलाबाची फुलं लाल, गुलाबी शिवाय इतर अनेक रंगात असतात हे मामाच्या बागेतच पहिल्यांदा बघितलं. पारिजातकाचा मनसोक्त सडा पडला की ती फुलं गोळा करून, आपल्या गणपती बाप्पासाठी त्यांचा हार बनवायचा. इतकी मोठी जास्वदांची फुलं, हात लावले की मिटणार लाजाळू, छोटेसे लॉन, गांडूळ आणि कंपोस्ट खताचे घरगुती प्रकल्प, ही सगळी रंगीबेरंगी दुनिया माझ्या मामाच्या बागेत होती.

जशी मामाच्या घरची बाग वेगवेगळ्या रंगानी बहरलेली असायची तसा आमचा मामादेखील दिलखुलास, सगळ्यांना आपलसं करून घेणारा,आजूबाजूच्या सर्वांना प्रसन्न करणारा, हवाहवासा वाटणारा व्यक्ती होता. जो कुणी मामाच्या सहवासात आला तो मामाचा मित्र झाला असा त्याचा मनमोकळा स्वभाव. मामा बद्दल सांगायला बरेच काही…

मी चित्रकार तर नाही पण कुणी मला मामाचे चित्र काढायला सांगितले तर त्यात फक्त मामा न दाखवता, मामाचे टुमदार घर, शेजारी फियाट गाडी, घराभोवती बहरलेली बाग, आणि त्या बागेला पाणी देणाऱ्या मामाचे असे संपूर्ण चित्र मला काढले तरच ते परिपूर्ण वाटेल. शेवटी माझ्या मामाचे प्रतिबिंब मला त्याच्या बागेत दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.