उत्तम मिठाई भंडारवर FDA ने कारवाई करून परवाना रद्द केले म्हणे.
बातमी वाचून मला आठवण आली ते माझ्या आजोबांची.
उत्तम मिठाईला मागे हॉटेल आहे आणि टेबलवर बसून ऑर्डर देऊन इम्रती / फरसाण खाता येते हे माझ्या इवल्याशा जगापासून लपून राहिलेले वैदिक सत्य मला आमच्या मामांमुळे (म्हणजे माझे आजोबा) समजले.
आमचे मामा म्हणजे खवय्या माणूस,त्यांना बाहेर चविष्ट खाण्याचा फार नाद.
“तुला इम्रती आवडते ना, चल आपण आज आणू तुझ्यासाठी” असे म्हणत नातवाच्या नावावर इम्रतीचे बिल फाडून स्वतः दोन समोसे आणि फरसाण खाऊन येण्याची चविष्ट रणनीती आमच्या मामांची. माझ्या इम्रती आवडण्याचा गोडसर गैरवापर करून त्यांनी स्वतः किती आणि किती आणि काय खाल्लं आहे, याचा सगळा जमाखर्च फक्त माझ्याकडे नोंदलेला आहे.
तेव्हा मला वाटायचं, मामा माझ्यासाठी इम्रती आणतायत. पण खरा हिशोब पार उलटा होता. त्या फसवणुकीत सुद्धा एक गोडवाच होता, तो आजही जिभेवर तसाच आहे.!
आज त्या बातमीमुळे अचानक हे सगळं डोळ्यांसमोर उभं राहिलं. खरं सांगायचं तर एखाद्या दुकानाची ओळख त्याच्या परवान्याने किंवा बोर्डाने होत नाही. आपल्या आयुष्यातल्या आठवणींनी होते.
उत्तम मिठाई म्हणजे माझ्यासाठी इम्रती नाही, समोसे नाहीत, फरसाण नाही. ते म्हणजे मामांसोबतच्या आठवणी. त्यांच्या त्या खवय्या चेहऱ्यावरचं समाधान. आणि नातवाच्या नावावर स्वतःची खाद्ययात्रा प्रायोजित करण्याची त्यांची निरागस कला.
FDA ची कारवाई योग्य की अयोग्य, त्यावर माझं काही मत नाही. नियम पाळलेच पाहिजेत.
पण काही बातम्या अशा असतात की त्या वर्तमानापेक्षा भूतकाळ जास्त उघडतात.
FDA ने उत्तम मिठाईचा परवाना भलेही रद्द केला असेल, पण त्या इम्रतीच्या गोडीत लपलेलं आजोबचं प्रेम याला मात्र कुठलं FDA रद्द करू शकत नाही.
उत्तमची मिठाई एक्सपायर होईल कदाचित, पण आमच्या मामांची आठवण कधी शिळी होणार नाही. आठवणींच्या चवीला एक्सपायरी डेट नसते.
