पराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वतःचे आयुष्य भारतमातेसाठी वाहून देणाऱ्या युवकांपैकी एक अनंत कान्हेरे. केवळ १९ वर्षांच्या आपल्या आयुष्यात सर्वांनाच थक्क करेल आणि युवकांना प्रेरणा देईल असे कर्तुत्व गाजवणाऱ्या अनंत कान्हेरेंचा आज स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती देऊन यज्ञकुंड प्रज्वलित ठेवण्याचे महान कार्य करणाऱ्या अनेकानेक क्रांतीकारांपैकी ज्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जावे अशांपैकी एक अनंत कान्हेरे..!
अगदी कोवळ्या अठरा वर्षे वयात हातात पिस्तुल घेऊन बाबाराव सावरकर यांना कारावासात धाडणाऱ्या कुकर्मी जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्यावर भर सभेत गोळ्या झाडणाऱ्या या तरुणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.अभिनव भारत च्या विचारांनी प्रेरित झालेला हा युवक इतिहासात अजरामर होऊन गेला.
माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोकणातील आयनीमेटे गाव सोडून औरंगाबाद सारख्या गावी हा युवक राहू लागला.येथेच त्यांची भेट गंगाराम मारवाडी नामक व्यावसायिकाशी झाली व कान्हेरे त्यांच्याच वाड्यात राहू लागले.गंगाराम मारवाडी हे देशप्रेमाने प्रेरित अभिनव भारत चे काम करत.अनंतकुमार कान्हेरेंची स्वातंत्र्य चळवळीत काम करण्याची इच्छा पाहून त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि पाहता पाहता गरम काचेचा जळता कंदील अनंतकुमार ने दोन्ही हाताने लीलया उचलला. जळणाऱ्या दोन्ही हातांची परवा न करता हीच आपली स्वातंत्र्यकार्याची शपथ आहे असे म्हणत अनंत कान्हेरे इतिहासात अजरामर झालेल्या त्यांच्या कर्तुत्वाला कटिबद्ध झाले.
नाशिकचा क्रूर जिल्हाधिकारी जॅक्सन याच्यावर तिथल्या अभिनव भारत च्या तरुणांचा रोष होता, पण त्याच्या हत्येचा कट होता पण ‘नाशिकचे कोणी तरुण पुढे येणार नसतील तर मी नाशिकला जातो आणि मी जॅक्सनबाबत प्रत्यक्ष कृती करतो,मला नाशिकच्या तरुणांनी सहकार्य करावे’ असे म्हणत अनंत कान्हेरेनी जबाबदारी स्वीकारली. तत्काळ नाशिकला दाखल होऊन जॅक्सनचा बराच अभ्यास केला आणि वधाचा कट रचला. जॅक्सनची बदली होणार म्हणून त्याकरिता आयोजित कार्यक्रमात भर सभागृहात त्या क्रूरकर्मीवर धाडधाड ४ गोळ्या झाडून हा तरुण शांत उभा राहिला.
पुढे जॅक्सनहत्येचा खटला चालून १९ एप्रिल १९१० रोजी अनंतकुमार कान्हेरे तसेच कृष्णाजी कर्वे,विनायक देशपांडे या तिघांना ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.
अगदी १९ वर्ष वयाच्या काळात हाती पिस्तुल घेऊन स्वातंत्र्य रण युद्धात उडी घेणाऱ्या या तरुणासमोर आजच्या प्रत्येक युवकाने नतमस्तक व्हावे असेच त्याचे कार्य आहे.इतिहासात अजरामर झालेला हा तरुण आणि त्याचे कर्तुत्व हे प्रत्येकानेच वाचले पाहिजे आत्मसात केले पाहिजे.
अनंत कृष्ण कान्हेरेंच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सर्वच त्यांना अभिवादन करूया