आपल्याला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं. “मिळालं”. जणू काही ते आकाशातून पावसासारखं पडलं, लॉटरी लागावी तसं अचानक हातात आलं. किंवा इंग्रज एका सकाळी उठले आणि म्हणाले, “चला, आता यांना स्वातंत्र्य देऊन टाकू.!”
आपण सगळे हे वाक्य किती सहज बोलून जातो. पण ‘मिळालं’ आणि ‘मिळवलं’ या दोन शब्दांत केवढं अंतर आहे बघा. भेट मिळते, वारसा मिळतो, बक्षीस मिळतं, फुकटची वस्तू मिळते. या शब्दांत कष्ट नसतात, फक्त नशीब असतं. आणि भारतीय स्वातंत्र्य? ते नशिबाने नाही, रक्ताने आलं आहे. मागून नाही, हिसकावून घेतलं गेलं.
भाषा फार फसवी असते. “मिळालं” एवढा एक शब्द म्हटला, की मागच्या दीडशे वर्षांची किंमत एका झटक्यात पुसली जाते. जालियनवाला बागेत चालवलेल्या गोळ्या, काळ्या पाण्यातल्या कोठड्या, असंख्य वीरांच्या गळ्याभोवती आवळलेले फाशीचे दोर, तुरुंगात सडून गेलेली तारुण्यं, पोरकी झालेली घरं. हे सगळं त्या एका गुळगुळीत शब्दाखाली गाडलं जातं.
आणि ही किंमत मोजणारे तरी कोण होते? आजच्या भाषेत सांगायचं तर आपल्या घरातली कॉलेजला जाणारी पोरं, आजची ‘जेन झी’. नाशिकच्या अनंत कान्हेरेने वयाच्या अठराव्या वर्षी जॅक्सनला गोळ्या घालून स्वतः फासाला मिठी मारली. ज्या वयात आपण आपलं पहिलं मत, पहिला फोन, पहिली बाईक, पहिली नोकरी याची स्वप्नं बघतो, त्या वयात तेव्हा त्या पोराने जळत्या दिव्यावर हात धरून भारतमातेची शपथ घेतली होती. या कर्तृत्वातून त्याला स्वतःला ‘मिळालेलं’ असं काहीच नव्हतं. त्याने पुढच्या पिढ्यांसाठी ‘मिळवून’ दिलं ते स्वातंत्र्य. आणि ती पुढची पिढी म्हणजे आपण.
पण गंमत अशी, की स्वातंत्र्य मिळवणं हे एक लढा देऊन कायमचं संपणारं काम नव्हतं. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘शब्दाचे सामर्थ्य’ या आपल्या आत्मपर लेखनात एक मार्मिक गोष्ट लिहिली आहे. स्वातंत्र्याच्या पहाटे, तो तिरंगा डोळ्यांनी पाहताना त्यांच्या मनात विचार आला. ते लिहितात, “स्वातंत्र्य मिळवलं होतं; पण ते मिळालं आहे, हे पुढच्या काळात जनतेला पटवावं लागणारं होतं.” त्यांचा रोख राजकीय होता, नव्या राज्यकर्त्यांच्या जबाबदारीकडे होता. पण त्या वाक्याला एक व्यापक अर्थही आहे. लढून स्वातंत्र्य आणणं ही एक गोष्ट, आणि ते प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यात खरं करून दाखवणं ही पूर्ण वेगळी गोष्ट. एक स्वातंत्र्य लढा संपला तिथे दुसरा स्वातंत्र्य जगण्याचा लढा सुरू झाला.
जुनी माणसं म्हणायची, कष्टाची भाकर गोड लागते. फुकट मिळालेली गोष्ट माणूस जपत नाही, उधळतो. आणि नेमकं तेच आपण करतोय. मतदानाचा हक्क फुकट मिळाला, म्हणून निवडणुकीचा दिवस आपण सहलीला जाऊन किंवा घरी लोळत घालवतो. बोलण्याचं स्वातंत्र्य फुकट मिळालं, म्हणून ते आपण फेसबुक, ट्विटरच्या पोकळ भांडणांत आणि शिवीगाळीत वाया घालवतो. जो हक्क कोणीतरी प्राण देऊन मिळवला, तो आपल्याला दोन क्लिकमध्ये मिळतो, म्हणून त्याची किंमतच वाटत नाही.
मग खरा प्रश्न आपल्या थोर स्वातंत्र्य सैनिकांबद्दल नाहीच. त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं, हे तर नक्कीच. प्रश्न आपल्याबद्दल आहे. आपण ते फक्त भोगतोय, की त्याच्या लायकीचे होतोय?
कारण स्वातंत्र्य ही एकदाच घडून संपणारी घटना नाही. यशवंतराव म्हणाले तसं, ती पुढच्या काळात पुन्हा पटवून द्यावी लागणारी, रोज नव्याने कमवावी लागणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढीला आपापल्या परीने ती पुन्हा मिळवावी लागते. कधी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून, कधी योग्य माणसाला मत देऊन, कधी भ्रष्टाचाराला नकार देऊन, तर कधी नुसतं आपल्या जागी प्रामाणिक राहून.
त्यांचं काम स्वातंत्र्य मिळवणं होतं. आपलं काम, ते मिळवण्याच्या लायकीचं होणं आहे.
१९४७ साली स्वातंत्र्य ‘मिळालं’, हे खरं. पण ते रोज ‘मिळवत’ राहणं, हे मात्र अजून बाकी आहे.
