शिवकाळात या महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या भूमीला लाभेलेले थोर संत रामदास वर्तमान अन भविष्याचा वेध घेत आपल्या श्लोकातून म्हणतात
“आहे तेवढे जतन करावे | पुढे आणिक मेळवावे |
महाराष्ट्र राज्य करावे | जिकडे तिकडे || “
याच संतभूमीची शिकवण घेऊन वाढलेले आजचे आधुनिक मराठी जन,महाराष्ट्राच्या माय मराठी ची पताका सर्वदूर करण्यास अजून एकदा सिद्ध जाहले आहेत.
अमृतातेही पैजा जिंकणारी आपली माय मराठी ही संगणक युगात आपला डिजिटल ठसा उमटवल्या वाचून राहणे शक्य नाही.अन हीच डिजिटल पताका घेऊन ती सर्वदूर करण्यास निघाली आहेत मराठी नेटकर मंडळी.फेसबुक अन ट्विटर च्या काळात मराठीचा डंका जोरदार पिटणारा अन विश्वाला आपल्या मराठीची ओळख देऊन या संतांच्या भाषेचे संवर्धन वृद्धिंगत करणारा एक अनोखा उपक्रम होणार आहे.
येत्या १५ जानेवारी पासून पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सालाबाद प्रमाणे साजरे होईलच पण हीच संधी साधून याच साहित्य संमेलनासारखे एक डिजिटल संमेलन यावर्षी ट्विटर वर होणार आहे.ट्विटरवरची मराठी मंडळी आणि @MarathiWord यांच्या पुढाकाराने एक छोटेखानी वाटणारे पण मुळात संपूर्ण सोशल विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकेल असे हे संमेलन.
या संमेलनात होणार काय? तर #ट्विटरसंमेलन हा हॅशटॅग वापरून ट्विटरजन विविध साहित्य ट्विटर वर प्रकाशित करतील.
आजच्या धावपळीच्या युगात आपली लेखनाची,विचार मांडण्याची,कविता करण्याची,कथा सांगण्याची,प्रवासवर्णनं लिहिण्याची हौस फेसबुक भिंती,ब्लॉग्स,ट्विटर च्या माध्यमातून पुरी करताना,लिहिताना,व्यक्त होताना दिसतात.आता हेच आधुनिक साहित्यिक हे अनोखे आधुनिक साहित्य संमेलन ट्विट द्वारे भरवणार आहेत.
आधुनिक साहित्याचे १२ प्रकार अन त्या प्रत्येक प्रकाराचे १२ हॅशटॅग निर्माण केले आहेत.आपल्या साहित्याच्या प्रकारानुसार योग्य तो हॅशटॅग तसेच #ट्विटरसंमेलन हा मुख्य हॅशटॅग १५ ते १८ जानेवारी २०१६ दरम्यान वापरून कोणीही नेटकर या संमेलनात सहभागी होऊ शकतो.
या करिता आपण पूर्वी लिहिलेले ब्लॉग्स,कथा,विचार,कविता,प्रवासवर्णन ई. किंवा चालू काळात लिहित असलेले असे कुठलेही मराठी साहित्य किंवा त्याच्या लिंक्स तुम्ही ट्विट करू शकता.
हे बारा हॅशटॅग पुढीलप्रमाणे
1) #माझीकविता :
तुम्ही कविता,चारोळ्या,गाणी,ओव्या,भजन,मराठी गझला लिहता ? मग #माझीकविता वापरून आपण आपल्या कविता हजारो लोकांपर्यंत एका क्षणात पोहचवू शकता.कवितेचे शक्यतो छायाचित्र पाठवावे,वाचण्यास सोपे जाईल(कविता मोठी असेल तर).
2) #माझीकथा :
तुम्ही कथा लिहली आहे ? किंवा लिहू शकता ? तर वापरा #माझीकथा आणि आपल्या कथा आमच्यापर्यंत पोहचवा.आपण खुद्द ट्विटरवर पन्नास ते शंभर ट्विट्स मध्ये कथा लिहू शकता.हा नक्कीच एक वेगळा अनुभव असेल.
3) #माझाब्लाॅग :
तुम्ही ब्लाॅग लिहले आहेत ? किंवा लिहू शकता ? तुमच्या ब्लाॅग बद्दल आम्हाला कळवा #माझाब्लाॅग वापरून.
तुमच्याकडे ब्लाॅग नसेल तर नक्की बनवा.
4) #माझेविचार :
तुमचे मराठी साहित्य आणि भाषेबद्दलचे विचार आपण मुक्तपणे इथे नोंदवू शकता. संमेलनाद्वारे निवडलेल्या विषयांवर आपण आपले मत नोंदवू शकता.
5) #माझीबोलीभाषा
आपल्या बोलीभाषेबद्दल आपल्याला अभिमान आहे ? इतरांना तिची महती सांगायला आवडेल ? मग ती कोणतीही असो कोकणी,अहिरणी,
व-हाडी इत्यादी.त्या बोलीभाषेतील गाणी,शब्द,
ओव्या,म्हणी आणि बाकी सगळं आम्हाला सांगु शकता #माझीबोलीभाषा द्वारे.
6) #साहित्यसंमेलन
पिंपरी चिंचवड मध्ये भरणा-या अ.भा साहित्य संमेलनाबद्दलचे विचार आपण #साहित्यसंमेलन टॅग वापरून नोंदवू शकता.
7) #पुस्तकपरिचय :
आपल्याकडे संग्रही असणारे,आपण वाचलेली किंवा वाचणार आहात अशा पुस्तकांची ओळख आपण #पुस्तकपरिचय टॅग वापरून देऊ शकता.
याद्वारे बरीच मराठी पुस्तके पुन्हा चर्चेत येऊ शकतील.
8) #लेखकपरिचय :
आपल्या आवडत्या लेखकाबद्दल आपण #लेखकपरिचय टॅग वापरून त्यांची ग्रंथसंपदा,कार्यकाळ इ.माहिती देऊ शकता.मराठीच्या या थोरांची महती सर्वांना कळणे गरजेचे आहे.
9) #सध्यावाचतोय :
तुम्ही सध्या काय वाचताय ? सांगा आम्हाला #सध्यावाचतोय हा टॅग वापरून. तुम्ही त्या पुस्तकाची समिक्षा इथे ट्विट करू शकता.
10) #सलामपाडगांवकर :
कविवर्य मंगेश पाडगांवकर यांना आपण #ट्विटरसंमेलन मध्ये श्रद्धांजली वाहणार आहोत. आपल्या या लाडक्या कवी आजोबाबद्दल आपण आपले विचार मांडू शकता #सलामपाडगांवकर वापरून.
11) #हायटेक_मराठी:
मराठी भाषेसाठी निर्माण झालेले अॅप,संकेतस्थळे,तंत्रज्ञानावरची पुस्तके,ब्लाॅग्स इ. बद्दल आपण #हायटेक_मराठी वापरून चर्चा करू शकता.मराठीला तंत्रज्ञानाची भाषा बनवू
पाहणा-या प्रत्येक धडपडीचे आपण कौतुक करूया.
12 ) #मराठी_विश्वकोश_दर्शन
आपण या संमेलनादरम्याण मद्दाम marathivishwakosh.in ला भेट देऊन,
आवडलेल्या नोंदी #मराठी_विश्वकोश_दर्शन टॅग वापरून इतरांना सांगणार आहोत, ज्ञानाचे हे भंडार आपण आता उघडून त्याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. चला विश्वकोशाचे हे “विश्वरूप” अनुभवूया.
या सोबतच eboo.co.in यांच्यातर्फे अगदी विनामुल्य खालील उपक्रम राबवण्यात येत आहेत. अशाप्रकारे सर्वच जण काहीना काही मार्गाने मराठी वृद्धिंगत करण्यासाठी हातभार लावत आहेत.
1) सादर करण्यात आलेल्या उत्तम कवितांचे, कथांचे ईपुस्तक प्रकाशित केले जाणार आहे,
2) कविता व कथा कथन विडिओ स्वरूपात सादर करता येणार आहे
3) त्याचे प्रक्षेपण EBOOच्या youtube वाहिनी वर करता येणार आहे जेणे करून एकाच ठिकाणी सगळे व्हिडिओ उपलब्ध होणार आहेत.
हे सर्व साहित्य मराठी भाषेतूनच असणे आवश्यक आहे.
चला तर नेटकर मंडळी,अटकेपार झेंडे रोवणाऱ्या आपल्या इतिहासाची शान आणखी वाढवूया,ही मराठी पताका,महाराष्ट्र ध्वज जगभर नेऊया.
कारण,लक्षात घ्या,ह्या प्रकारचं संमेलन किंवा असा उपक्रम यापूर्वी जगात कोणत्याही भाषेत,कुठेही झाल्याचे ऐकिवात नाही,अगदी इंग्रजी भाषेत देखील असे एखादे कार्य या आधुनिक नव्या युगाच्या मंचावर झालेलं नाही,आपल्या माय मराठी चा हा मान पहिला असणार आहे.
सोशल मिडीयाच्या इतिहासात मराठीचं नाव विश्वरूपी अग्रेसर करणारा हा उपक्रम होत आहे,त्यात सहभागी होत असलेल्या प्रत्येकच मराठी मावळ्याला शुभेच्छा.आपण माझेही ट्विट शेजारील ट्विटर बॉक्स मध्ये पाहू शकताच किंवा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ट्विटर वर मला येथे @ashutoshab फॉलो करू शकता
(माहिती स्रोत आभार – @MarathiWord)
स्तुत्य उपक्रम आहे!!
#मराठीईबुक हा टैग वापरून आपल्या आवडत्या ईबुक ची लिंक शेयर करायला विसरू नका – ई साहित्य प्रतिष्ठान
http://Www.esahity.com
धन्यवाद,
सविस्तर माहिती अनेकांना लाभदायक ठरेल.
मराठी वृद्धिंगत व्हावी ह्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न महत्वाचे असतील.