आपल्या घरचा वायफाय राऊटर कसा सुरक्षित करायचा?

आता घरोघरी ब्रॉडबॅंड ही एक गरजेची सुविधा झाली आहे. किमान सर्व मोठ्या शहरांत ब्रॉडबॅंड चांगलेच प्रचलित असून घरोघरी त्याचा वापर होतोच. ह्या ब्रॉडबॅंड सोबतच जोडणी दिली असते ती ‘वायफाय’ ची. प्रत्येकाच्या हातात असणार्‍या स्मार्टफोनला सतत कनेक्ट ठेवणं तर आलेच. त्यात घरी वायफाय असणे इंटरनेट खर्चाचा भार कमी करतेच, पण मोबाइल इंटरनेटच्या तुलनेत बराच अधिक वेग देतं. त्यामुळे वायफाय ही गरजेची वस्तु झाली आहे. सोबतच कोरोना मुळे अनेकांना लाभलेले ‘वर्क फ्रॉम होम’ घरात वायफायला आवश्यक बनवते.

अशाच काही कारणामुळे अनेकांकडे वायफायचं आगमन झालं असेलच. हा वायफाय डिव्हाईस, ज्याला आपण वायफाय राऊटर म्हणतो त्याची सुरक्षा देखील महत्वाची आहे. आपल्या घरचा वायफाय सुरक्षित नसेल तर सायबर चोरांना घरच्या नेटवर्क मध्ये आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे आपल्या घरच्या वायफायला सुरक्षित करण्याचे काही मार्ग मी सुचवत आहे.

आपण जेव्हा खाजगी ठिकाणांवर, आपल्या कार्यालयात असतांना तिथले वायफाय वापरत असतो तेव्हा त्यांच्या वायफायच्या सुरक्षेची काळजी त्यांनीच घेतली आहे असे अपेक्षित असते. पण जेव्हा आपण घरात वायफाय लावतो तेव्हा त्याच्या जोडण्या देऊन आपल्याला इंटरनेट मिळाले की काम झाले असे नसते. त्याची देखभाल आणि सुरक्षेची आपणच काळजी घेतली पाहिजे.

वायफाय राऊटर कसा सुरक्षित करायचा?

वायफाय राऊटरचे डिफॉल्ट एसएसआयडी बदला

जेव्हा आपण नवीन वायफाय राऊटर विकत घेतलेला असतो, तो कंपनी कडून काही डिफॉल्ट सेटिंग्स घेऊन येतो जसे की त्याचे एसएसआयडी नाव. उदाहरणार्थ आपण जर नेटगेयर कंपनीचा वायफाय राऊटर घेतला असेल तर त्याचे नाव आधीच ‘NETGEAR18’ असे असते. तसेच डिलिंक कंपनीचे ‘DLink’ असे नाव आपल्याला आढळेल. हे नाव बदलून त्याचे काहीतरी इतर नाव ठेवायला हवे. तुम्ही स्वतःचे नाव देऊ शकता, पण त्या ऐवजी आपण थोडा आपल्या कल्पनाशक्तीला जोर देऊन थोडे कल्पक नाव ठेवावे.

ह्याचा फायदा असा असतो की, कुणी आपल्या वायफायच्या कक्षेत येऊन नेटवर्क स्कॅन केले तरी त्याला आपला एसएसआयडी पाहून आपल्याकडे कोणत्या कंपनीचा डिव्हाईस आहे हे कळणार नाही. आपला डिवाइस कोणत्या कंपनीचा आहे हे कळाले तरी हॅकरचे काम सोपे होते कारण त्याला नेमके त्याच कंपनीच्या डिवाइसला हॅक करण्याचे मार्ग शोधावे लागतात. हे थोडेसे अचंबित करणारे वाटेल पण सायबर सुरक्षेत ‘डिफॉल्ट’ न वापरणे ही पहिली पायरी मानली जाते. ह्या पुढचा उपाय सुचवताना मी हे अधिक स्पष्ट करेन.

वायफाय राऊटरचे अड्मिन पासवर्ड बदला

जसे प्रत्येक कंपनीचे वायफाय राऊटर त्यांचे डिफॉल्ट ‘एसएसआयडी’ सोबत घेऊन येतात तसेच त्यांचे अड्मिन यूजर आणि पासवर्ड सुद्धा डिफॉल्ट असतात. प्रत्येक राऊटरच्या सेटिंग्स बघण्यासाठी एक विशेष लॉगिन दिलेले असते. त्याला ‘अड्मिन लॉगिन’ म्हणतात. प्रत्येक कंपनीचे अड्मिन लॉगिन चे डिफॉल्ट यूजर आणि पासवर्ड ठरलेले असतात. ते आपण सर्वात आधी बदलायला हवेत. कारण हे डिफॉल्ट लॉगिन जगात सर्वांना माहीत आहेत, कुणीही येऊन त्यात लॉगिन करू शकेल.

जर तुम्ही तुमच्या वायफाय राऊटरचे डिफॉल्ट एसएसआयडी बदलले नाहीत, तर त्यावरून तो कोणत्या कंपनीचा आहे हे कुणालाही कळेल. आणि ज्या कंपनीच राऊटर आहे त्याच कंपनीचे डिफॉल्ट यूजरनेम आणि पासवर्ड टाकले की थेट वायफाय राऊटरचा ताबा घेता येतो. एकदा राऊटरचा ताबा मिळाला की सर्वच नियंत्रण मिळवता येते.

वायफाय राऊटरचे डिफॉल्ट आयपी अड्रेस बदला

बहुतांश आपल्या घरात वायफायचे आयपी अड्रेस हे 192.168.1.1 किंवा 192.168.0.1 ह्या मालिकेतले असतात. हे सामान्य आहे. ह्याला आयपी सबनेट म्हणतात. हे बदलल्याने सुरक्षेत खूप मोठा फरक पडणार नाही, पण तरी हे बदलणे उत्तम असते. अर्थात हे करताना काळजी घ्यावी, ह्या सेटिंग्स वर काम करताना ज्यांना ह्यांची माहिती आहे अशा व्यक्तीची मदत घ्या. ह्या सेटिंग्स बदलताना चूक झाली तरी तुम्हाला इंटरनेट मिळणे बंद होऊ शकते. जर आपणाला ह्या सेटिंग्स समजत नसतील तर त्या तशाच राहू दिल्याने फारसा मोठा धोका नाही.

वायफाय राऊटरचे सुरक्षित पासवर्ड

पासवर्ड सुरक्षेबद्दल वेगळे काही सांगायला नको. जसे आपण इतर कुठल्याही पासवर्डचे नियम पाळतो तसेच आपल्या वायफायचे पासवर्ड समजण्यास अवघड आणि कठीण असायला हवेत. आपल्या परिचयात असणार्‍या गोष्टींची नावे पासवर्ड म्हणून वापरू नयेत. उदाहरणार्थ आपला मोबाइल क्रमांक, आपल्या वाहनाचा क्रमांक, आपले आडनाव इत्यादि.

आपण ठरवलेले पासवर्ड केवळ आवश्यक त्याच व्यक्तींना द्या. घरातील व्यक्ति, नेहमी घरी येणारे मित्र आणि नातेवाईक हयांशिवाय फारसे कुणाला वायफाय पासवर्ड सांगण्याची गरज नाही. शेजारी अथवा क्वचितच घरी आलेले लोक ह्यांना पासवर्ड दिल्यास त्यांचा ते वापर कसा करतात ह्याची खात्री तुम्हाला आहे का? तसेच हे पासवर्ड वेळोवेळी बदलत रहा ज्यामुळे आपला पासवर्ड इतरांना माहीत झाले असतील तरी ते काही दिवसांत निकामी होतील.

वायफाय राऊटर अद्ययावत ठेवणे

जसे आपल्या स्मार्टफोन मधील अप्लिकेशन आणि ओएस ह्यांचे अपडेट (अद्यतने) वेळोवेळी उपलब्ध होतात आणि ते आपण अपडेट (अद्ययावत) करतो, तसेच प्रत्येक राऊटर मध्ये असणार्‍या सॉफ्टवेअरची अद्यतने दर काही महिन्यांनी उपलबद्ध होतात. ती वेळोवेळी अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक असते, कारण ही अद्यतने (अपडेट्स) बरेचदा सुरक्षे संबंधी सुधारणा करून देतात. वायफाय राऊटर अद्यायवत कसे कारचे ह्याचे मार्गदर्शन तुम्हाला वापरकर्ता पुस्तिकेत मिळेल.

वायफाय राऊटर सुरक्षित जागी ठेवणे

वायफाय सुरक्षेत आपले वायफाय राऊटर घरात कुठे ठेवले आहे ह्यालादेखील महत्व आहे. जसे राऊटरचे सॉफ्टवेअर सुरक्षित करणे महत्वाचे आहे, तसेच त्याची भौतिक सुरक्षा महत्वाची आहे. वायफाय राऊटर जवळ आपल्याशिवाय इतर कुणीही पोचू नये अशाच जागी त्याला ठेवावे. ते कायम घरात आणि जिथे कुणी सहज पोचणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. कारण जसे कुणी आपला पासवर्ड घेऊन त्याद्वारे आपला राऊटर हॅक करू शकतो, तसेच एखाद्याला राऊटरजवळ जयची संधि मिळाली तर थेट राऊटरचा ताबा, कसल्याही पासवर्ड शिवाय घेता येतो. तुम्ही वायफाय राऊटर वर असणारे ‘रिसेट’ बटन बघितलेच असेल, जर आपल्या राऊटर जवळ येऊन कुणी सर्वकाही अचानक रिसेट केले तर? पुन्हा तेच डिफॉल्ट पासवर्ड टाकून थेट राऊटरचा ताबा घेता येतो.

वायफाय राऊटर सहज नजरेस पडणार नाही, आणि तिथवर सहजसहजी कुणी पोचू शकणार नाही अशाच जागेवर ठेवावेत.

वापरात नसताना वायफाय राऊटर बंद करून टाका

आपण गावाला जाताना, किंवा बाहेर जाताना जेव्हा आपल्याला घरच्या वायफायची गरज नसते तेव्हा आपला वायफाय राऊटर बंद करणे हा एक चांगला उपाय आहे. कारण ह्यावेळी आपल्या अनुपस्थिती कुणी वायफाय सोबत काही करू पाहत असल्यास त्याला आळा घालता येतो. जर वायफाय राऊटर बंदच असेल तर ते हॅक तरी कसे करता येईल?

हे झाले काही उपाय ज्याद्वारे आपण आपल्या घरातील वायफाय सुरक्षित ठेऊ शकता. ह्या व्यतिरिक्त इतरही काही उपयोग आहेत. जसे की वायफाय राऊटर मधील फायरवाल वापरणे. वायफाय मध्ये डीएचसीपी बंद करणे. केवळ आपल्या डिव्हाईसना नेटवर्क देणे. पण हे करताना बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या करिता आपल्याला नेटवर्क इंजिनियरची गरज पडू शकते. त्यामुळे मी ते इथे नमूद केलेले नाही. अशी अपेक्षा करतो की हयाद्वारे आपण आपल्या घराचे वायफाय सुरक्षित करू शकाल.

बाकी नेहमी प्रमाणे मी आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतच आहे. मी इतर कुठल्या विषयांवर माहिती लिहावी असे आपल्याला वाटते? प्रतिक्रिया देऊन कळवा.

चित्र स्रोत: Technology photo created by freepik – www.freepik.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.