हॅकिंग आणि गैरसमज

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला होऊन त्यात 90 कोटी रुपये देशाबाहेरील बँकांमधील खात्यांत वळते केल्याचा प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण समजताच अनेकांनी त्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हा प्रकार नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट नाही, वरवर तरी हा SWIFT Attack वाटत असला तरी ह्यात खोलवर तपास होऊन गडबड कुठे आहे हे लक्षात येईलच. चोर पकडले जाणार नाहीत कदाचित पण ह्यावर सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.

कुठल्याही आस्थापनेत ऑनलाइन व्यवहार करायचे असतील, तर त्यासाठी एक जागतिक नियमावली आहे. सगळ्या तांत्रिक गोष्टी कशा असाव्यात ह्याचे काटेकोर कायदे अन नियम आहेत, ते पाळले जात असतील तरच ऑनलाइन वित्त सुविधा पुरवता येतात. कॉसमॉस बँकेने देखील हे सगळे नियम पाळले म्हणूनच त्यांना ऑनलाइन व्यवहारांची परवानगी असणार आहे. पण तरी हॅकिंग चा प्रकार घडला म्हणजे हे बँकेने नियम पाळले नाहीत, सायबर सुरक्षा अद्ययावत नव्हती म्हणणं चुकीचं ठरेल.

सायबर सुरक्षेचा एक अलिखित नियम आहे, तो असा की तुम्ही कितीही सुरक्षा बाळगा तुम्ही हॅकिंग रोखू शकत नाही. कारण सायबर हल्ला कोणत्या प्रकारे होईल हे हल्ला होई पर्यंत कुणीही सांगू शकत नाही. एखादा नवीन प्रकारचा हल्ला सायबर तज्ज्ञांना तेव्हाच सापडतो जेव्हा तो हल्ला प्रत्यक्षात होतो अन त्यानंतरच त्यावर उपाय करता येतात. त्यामुळे हा हल्ला देखील कसा झाला ह्याचा अभ्यास करून, भविष्यात तो दुसऱ्या कुठल्या संस्थेवर केला जाऊ नये ह्यावर उपाय शोधता येतील.

हा एक हल्ला झाला म्हणजे ऑनलाइन व्यवहारच असुरक्षित आहेत, अख्खे डिजिटल जग धोकादायक आहे असा उगीच गैरसमज आपण करून घेतो. ह्याच्या आड लपून अनेकजण डिजिटल इंडिया अन ईव्हीएम हॅकिंग वर निशाणे धरत आहेत खरं. आपण एका गोष्टीचा विचार केला तर सहज लक्षात येईल, आपण कमावलेले पैसे खिशात ठेवले तर खिसेकापू ते पळवून नेईल, जर घरात ठेवले तर घरातून ते चोरी होऊ शकतात, बँकेत ठेवले तर बँकेवर दरोडा पडतो, ह्याचा अर्थ असा होतो का, की आपण पैसे जमवू नयेत?

पूर्वीच्या काळी जेव्हा बँका नव्हत्या तेव्हा घरांवरच दरोडे पडत, जेव्हा बँका आल्या तेव्हा लोकांनी पैसे दागिने बँकेत ठेवायला सुरू केले की बँकेवर दरोडा पडू लागला, थोडक्यात जिथे अडका तिथे दरोडा हे चोरांचे गणित. आज डिजिटल रुपात पैसे असतात त्यामुळे तिथेही चोऱ्या होणारच अन इथून काढून आपण त्याला कुठेही कोणत्याही रुपात पैसे साठवले तर आपण जाऊ तिथे चोर येणारच हे स्पष्ट आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहार सुरक्षित नाहीत असं नसून कुठलाही व्यवहार सुरक्षित नाही. फक्त चोरी करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे डिजिटल व्यवहार पूर्णतः असुरक्षित आहेत हे म्हणणं योग्य ठरत नाही.

त्यात हॅकिंग द्वारे पैसे चोरण्याचे बरेच मार्ग आहेत. कॉसमॉस बँकेत झालेला प्रकार बहुतांश तांत्रिक पातळीवर केलेला वरवर तरी वाटतो. त्या सोबत केवळ खोटे फोन करून डेबिट अन क्रेडिट कार्डची माहिती विचारून पैसे काढून घेण्याचे गुन्हे, कसल्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता, डिजिटल चोऱ्या होतातच. त्यामुळे केवळ तंत्रज्ञानाला दोष देण्यापेक्षा ह्याबद्दल अधिकाधिक जागरूकता पसरवणे आणि आपल्या मनात हॅकिंग बद्दल असलेले गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. हॅकिंग म्हणजे रोजच्या जीवनात होणारे गुन्हे डिजिटल रुपात करणं होय. अन जसं तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, हेच गुन्हे करण्याच्या पद्धती कालानुरूप झपाट्याने बदलत जाणार, किंबहुना गुन्हेगारांना काळानुरूप बदलणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडेल.

आशुतोष

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.