लोकहितवादी गोपाळराव देशमुख

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी नवशिक्षणाची कास धरून लेखणीद्वारे समाजसुधारकाच्या भूमिकेत आलेल्या केवळ मोजक्या थोर लोकांपैकी एक होत लोकहितवादीअर्थात गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींची शतपत्रे नावाने प्रसिद्धी मिळालेल्या लेखमालेवरून लोकहितवादी आपल्या परिचयाचे आहेत.

गोपाळराव देशमुखांना मिळालेली लोकहितवादी‘ ही ओळख मुळात त्यांनी लेखक म्हणून वापरलेले टोपणनाव आहे.गोपाळ हरी देशमुख (फेब्रुवारी १८, .. १८२३ ऑक्टोबर ९, .. १८९२). त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते.

भाऊ महाजन यांच्या प्रभाकरनामक साप्ताहिकातून शंभर निबंधांची एक मालिका म्हणजे शतपत्रेगोपाळराव देशमुख यांनी लोकहितवादीया टोपणनावाने लिहिली.हि मालिका प्रसिद्ध होऊन त्यांची ओळखच लोकहितवादी अशी झाली.शतपत्रे अर्थात शंभर लेखांची मालिका असली तरी या मालिकेत पत्रके हि १०८ आहेत. शंभर पत्रे पूर्ण झाल्यावर अजून १०० पत्रे लिहिण्याचा मानस लोकहितवादींचा होता,त्यातील पुढची आठ पत्रे प्रसिद्ध झाली देखील मात्र काही कारणाने प्रभाकर साप्ताहिक बंद पडले व ही लेखमाला देखील खंडित झाली.मात्र पुढच्या काळात लोकहितवादी देशमुखांनी विविध टोपणनावे घेऊन लिखाण सुरूच ठेवले.
लोकहितवादींचे शिक्षण हे संपूर्णतः मराठी भाषेत झाले असले तरी त्यांनी सोबतच इंग्रजीचे शिक्षण खाजगीरीत्या सुरु ठेवले.व त्यात नैपुण्य प्राप्त केले.काही काळ त्यांनी भाषांतरकार म्हणून देखील काम केले होते.लोकहितवादींचा जन्म झाला व शिक्षण झाले तो काळ हा इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीचाच काळ होता, त्यामुळे एकीकडे हजारो वर्ष जुन्या परंपरावादी शिक्षण घेणाऱ्या समाजाची एका अत्यंत आधुनिक इंग्रज संस्कृती व इंग्रजी भाषेशी ओळख झाली.त्यामुळे त्यावेळी बदलत्या काळाची गरज ओळखून इंग्रजी शिक्षण घेणाऱ्यांपैकी लोकहितवादी हे एक होत.

लोकहितवादींचे ओळख एक निष्पक्ष व्यक्ती म्हणून होती.लोकहितवादी आपल्या कार्यकाळात अनेक ठिकाणी मुन्सफ आदि न्यायखात्याच्या पदांवर काम करत होते.एकीकडे आधुनिकता,उद्योजकता,उदारमतवाद आदि नवधोरण घेऊन आलेल्या इंग्रजी संस्कृतींचे स्वागत करून त्यामुळे भारतीय समाज कसा विविधगुण संपन्न होऊ शकतो हे लोकहितवादी स्पष्ट करतात,मात्र त्याबरोबरच इंग्रजांची सत्ता देशावर नको,त्यातून निर्माण होत असलेले धोकेही त्यांनी अधोरेखित केले आहेत.

एकीकडे शेकडो वर्ष मुघल आदि इस्लामी राजवट भोगलेल्या सामान्य भारतीय जनतेला आता अजून एक परकीय राजवट इंग्रजांच्या रूपाने लाभलेली होती.परंतु इंग्रज राजवट व इस्लामी राजवट ह्या दोहोंमध्ये एक महत्वाचा भेद लोकहितवादींनी आपल्या शतपत्र मालेतून दाखवून दिला.इंग्रजांच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि ह्या देशाला दारिद्र्य येते, असे लोकहितवादींनी म्हटले आहे.

ह्या देशावर मुसलमानांनीही राज्य केले; परंतु मुस्लिम राज्यकर्त्यांनी कमावलेली संपत्ती ह्या देशाबाहेर गेली नाही; कारण मुसलमान आले, ते इकडेच राहिले; त्यांचा ‘परकी भाव’ गेला, असा एक महत्त्वाचा भेद नुसत्या नोकऱ्यांच्याच मागे न लागता, आपल्या लोकांनी व्यापारउद्योगातही मनःपूर्वक लक्ष घातले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. आळशीपणामुळे देश भिकारी झाला, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.इंग्रज आणि मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये लोकहितवादींनी दाखवून दिला.

लोकहितवादींच्या दूरदृष्टीचे अजून एक उदाहरण म्हणजे त्यांनी केलेला स्वदेशीचा आग्रह.महात्मा गांधीनी हि स्वदेशी चळवळ चालवण्याच्या कित्येक वर्ष आधीच लोकहितवादींनी स्वदेशीचे महत्व लिहून ठेवले होते.मुळात इंग्रजांनी वाफेची इंजिने,आधुनिक यंत्रसामग्री वापरून परकीय कापड स्वदेशी पेक्षा अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून एक प्रकारचे आर्थिक युद्धच उभे केले होते.इंग्लंडच्या ह्या यंत्रसामर्थ्याने आपल्यावर खरे आक्रमण केलेले आहे आणि आपण भिकारी होऊन लुटले गेलो आहोत; सिकंदर, गझनीचा महमूद, तैमूरलंग आणि नादिरशही ह्यांची चढाई त्या मानाने काहीच नव्हे; ह्या चढाईमुळे सर्व हिंदुस्थानची मजुरी विलायतेस गेल्यासारखी आहे, हे त्यांचे अचूक निरीक्षण होते.

विद्या हा समाजपरिवर्तनाचा मूलाधार आहे, अशी लोकहितवादींची धारणा होती. तथापि येथे विद्येचे क्षेत्र मर्यादित ठेवले गेल्यामुळे विद्याप्रसार होऊ शकला नाही. विद्या वाढविलीही गेली नाही. ‘विद्या म्हणजे केवळ धर्माचे ज्ञान’ असा विद्येचा अर्थही काळाच्या ओघात संकुचित झाला. ही विद्याही ग्रंथार्थ समजून न घेता केवळ पाठांतराच्या आधारे रक्षिली गेली. ह्यामुळे धर्मविषयीचे अज्ञान आणि कर्मकांडांचे स्तोम अतोनात वाढले.आपण नवनव्या विद्या आणि भाषा शिकाव्यात, इंग्रजी भाषा शिकण्याची, इंगजी राज्यामुळे मिळालेली संधी घेऊन, आपण इंग्रजी ग्रंथांमधले ज्ञान आत्मसात केले पाहिजे; कारण इंग्रजी विद्या फार सुधारलेली आहे. नवे ज्ञान तिच्यात आहे आणि ती विद्या सतत विकास पावत आहे, हे त्यांनी वारंवार सांगितले आहे.

लोकहितवादींनी मुख्यत: लिहिले, ते हिंदू समाजाबद्दल. तथापि अन्य धर्मीयांतील त्यांना अनुचित वाटणाऱ्या काही अपप्रवृत्तींवरही त्यांनी टीका केली आहे. तसेच इंग्रजही त्यांच्या टीकेतून सुटले नाहीत; कारण त्यांची सर्व टीका एका व्यापक सामाजिक चिकित्सेचे लक्ष्य ठेवून, पूर्णत: विधायक वृत्तीनेच त्यांनी केली आहे.सर्व धर्मीयांना सारखेच कायदे असावेत, असे लोकहितवादींचे मत होते.

लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तेव्हा ‘अर्थशास्त्र’ हा शब्द रुढ झालेला नव्हता.

लोकहितवादींचे खरे नाव ज्यात दिले आहे, असा त्यांनी लिहिलेला ग्रंथ उपलब्ध नाही. टोपण नावांनी त्यांनी लेखन केले.लोकहितवादींच्या अध्ययनकाळी विद्यापीठांची स्थापना झालेली नव्हती. इंग्रजी घेण्यातही लोकांच्या सनातनीपणाचा अडथळा होता. लोकहितवादींना ज्ञान मिळविले, ते मुख्यतः स्वप्रयत्नांनी. विविध विषयांमध्ये त्यांना स्वारस्य होते आणि त्यांची माहिती त्यांनी परिश्रमपूर्वक करून घेतलेली होती.

असे भव्य विचार लोकहितवादींनी जपले असताना त्यांच्या विचारांचा आदर मात्र तितकासा झालेला नाही. त्यांच्या विचारांवर दीर्घकाळ उपेक्षाच लाभली.रूढीपरंपरांच्या समाजात या आधुनिक विकासात्मक विचारांना चालना मिळण्यास जरा काळ व्यतीत व्हावा लागला.त्यांच्या समकालीन असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तर थेट लोकहितवादींवर टीकास्त्र सोडलेले होते.स्वदेश आणि स्वधर्म ह्यांबद्दल लोकहितवादींना निश्चितच अभिमान होता; परंतु तत्संबंधीच्या विधायक चिकित्सेला पारखे करणारे अंधत्व त्या अभिमानाला आलेले नव्हते. लोकहितवादींनी मांडलेल्या विचारांचे औचित्य काळानेच दाखवून दिले आहे.

लोकहितवादींचे ग्रंथसाहित्य

इतिहास

 • भरतखंडपर्व
 • पाणिपतची लढाई
 • ऐतिहासिक गोष्टी भाग १
 • ऐतिहासिक गोष्टी भाग २
 • ऐतिहासिक गोष्टी भाग ३
 • हिंदुस्थानचा इतिहास – पूर्वार्ध
 • गुजरात देशाचा इतिहास
 • लंकेचा इतिहास
 • सौराष्ट्र देशाचा साक्ष इतिहास
 • उदयपूरचा इतिहास

चरित्रे

 • पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास
 • पंडित स्वामी श्रीमद्‌दयानंद सरस्वती

धार्मिक-नैतिक

 • खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध
 • गीतातत्त्व
 • सुभाषित अथवा सुबोध वचने
 • स्वाध्याय
 • प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण
 • आश्वलायन गृह्यसूत्र
 • आगमप्रकाश
 • निगमप्रकाश

राज्यशास्त्र-अर्थशास्त्र

 • लक्ष्मीज्ञान
 • हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार
 • स्थानिक स्वराज्य व्यवस्था
 • ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती
 • स्वदेशी राज्ये व संस्थाने

समाजचिंतन

 • जातिभेद
 • भिक्षुक
 • प्राचीन आर्यविद्या व रीती
 • कलियुग
 • निबंधसंग्रह
 • विद्यालहरी

संकीर्ण

 • होळीविषयी उपदेश
 • महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण
 • सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण
 • यंत्रज्ञान
 • पदनामा
 • पुष्पयन
 • शब्दालंकार

लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके

 • लोकहितवादी
 • लोकहितवादी (ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक, एप्रिल१८८३पासून ते १८८७पर्यंत)

(विविध पुस्तक स्रोतांच्या आधारे संकलित माहिती)

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.