प्रवास – अनुभवांची शिदोरी

आयुष्य हा एक प्रवास आहे आणि ह्या आयुष्यात अनेक प्रवास आहेत. भाकरीच्या शिदोऱ्या बांधून प्रवासाला निघतात, अन अनुभवांच्या शिदोऱ्या घेऊन घरी परततात. आयुष्यातला प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन अनुभव घेऊन येतो आणि बरंच काही शिकवून जातो. आयुष्यात प्रवास आहेत म्हणून माणूस प्रगती करून पुढे जातोय. असाच काहीसा एक वेगळा अनुभव घेऊन एक प्रवास मागे घडला होता. आधीच्या ब्लॉग मध्ये मी श्रीलंकेच्या प्रवासाबद्दल तर लिहिलंच आहे, पण ह्यातला एक अनुभव सांगायचा राहिला आहे.

पंचपक्वान्नाचे जेवण समोर वाढले असताना देखील तोंडी लावायला म्हणून थोडं आंबटगोड लोणचे नाहीतर तिखट ठेचा हवाच वाटतो. तसे ह्या स्वर्गाहून रम्य लंकेत केवळ रमणीय प्रवास करून कसे भागेल. इथेही थोडी ‘कहानी मे ट्विस्ट’ पाहिजेच. आणि नेमकं कधी न कल्पना केलेला अनुभव घडला. आम्ही गेलो होतो कंपनीच्या कामाने. मी एकटा नव्हतो, माझ्या सोबत होते माझे सहकारी ‘शशिधर’. हे बंगळूरूचे राहणारे आणि ह्या कथेचे नायक.

पाच दिवस काम करण्याचे आणि दोन दिवस ‘जाणारच आहोत तर फिरून येऊया’ ह्या सबबीखाली आमचा प्रवास ठरला होता. सर्व कामे आटोपून एक पूर्ण दिवस उरला होता तो ‘जमलं तेवढं’ श्रीलंका फिरण्याचा. श्रीलंकेला निसर्गाचे देणे लाभले आहे, आणि त्याचा स्वच्छंदी आस्वाद घेणे हे एकमेव उद्दिष्ट्य घेऊन शेवटच्या दिवसाचा बेत आम्ही ठरवला. आम्ही कोलंबोत आणि तिथून थेट एकदिवासाची रेल्वे सहल कॅन्डी शहरापर्यंत करायची असा कार्यक्रम ठरवला, त्वरेने जाऊन रेल्वेची तिकिटे काढली. हा प्रवास आपण केलाच पाहिजे ह्या हट्टाने पेटून ठरवण्याचे काम आमच्या नायकाने केले होते. हे कथेचे नायक म्हणजे आमचे ‘शशी सर’. सकाळी कोलंबो वरून कॅन्डी ला जाणारी झुकझुकगाडी पकडायची, तिथले एक दोन ठिकाणं पहायचे आणि संध्याकाळच्या आगीनगाडीने परत अशी एक दिवसीय योजना आमच्या नायकाने ठरवली.

भल्या पहाटे उठून, कोलंबो स्थानक गाठले. आपल्या मुंबईच्या बांद्रा स्थानकासारखे वाटणारे छोटेसे पण टुमदार रेल्वेस्थानक. त्यात धावणाऱ्या इवल्याश्या रेल्वेगाड्या. हो पाच सात डब्यांच्या इवल्याश्या रेल्वेगाड्या. श्रीलंकेत गेलो कि सगळ्याच गोष्टी रमणीय वाटतात. आमची गाडी आली आणि आमचाही प्रवास सुरु झाला. हा मीटरगेज रेल्वेचा प्रवास. कोलंबो मधून रेल्वे बाहेर पडताच, इथला निसर्ग सुरु होतो.

पावसाचे पोटभर पाणी पिऊन इथला निसर्ग निगरगट्ट सर्वत्र पाय पसरून पहुडलेला. जिथे जिथे नजर फिरवावी तिथे सर्वत्र हिरवळ. छानदार भाताची शेत, उंच पर्वत टेकाडे, आणि गर्द झाडी. आपसूक मी खिडकीची जागा सोडून, सगळा प्रवास रेल्वेच्या दारात बसून करण्याचा निर्णय घेतला. कारण अमर्याद पसरलेला निसर्ग खिडकीच्या चौकटीत सामावून ठेवता येणारा नव्हता. आमच्या नायकाने कॅन्डीला जाण्याचे मुख्य कारण कॅन्डी शहर पाहणे असे नसून हा प्रवास अनुभवायचा आहे असे दिले होते. आणि नायक कथेमध्ये कधीच चुका करत नसतो, आणि शशी सरांची ही गोष्ट सुद्धा चुकली नव्हती. ह्या प्रवास खरेच एकदा अनुभव घेण्या सारखा होता. ही आगगाडी, धावता धावता थेट डोंगरावर चढतें अन तिथून हिरव्यागार नटलेल्या दऱ्या खोरे, अंधारी बोगदे, गर्द झाडीच्या चिंचोळ्या वाटा धरत आपल्याला स्वर्गसुखाचा मार्ग दाखवून आणते. निसर्गाच्या प्रेमरंगात न्हाऊन निघालेली आगगाडी धावत होती.

प्रवास - अनुभवांची शिदोरी 1

हा रमणीय प्रवास कधीच संपू नये असे वाटत असतानाच मात्र त्याचा शेवट येणार होता. अर्थात कॅन्डी शहर जवळ येत असल्याची माहिती मिळाली होती. पण शेवटाकडे चाललेल्या प्रवासाची खरी कहाणी तर अजून सुरु व्हावयाची होती. मी आपला दारात उभा राहून आपल्याच नादात मस्तवाल असताना, अचानक धावत शशी आले. आणि त्यांनी सांगितलं “बाबारे, माझा फोन रेल्वेतून खाली पडला” झालं. खरी कहाणी इथून सुरु होते. तत्काळ आमची धावाधाव,व्हावी. पण नेमके करावे काय, ह्या परदेशातल्या रेल्वेला ना ती “गाडी खडी करने के लिये जंजीर खिंचीये” वाली ‘जंजीर’ होती न तिथे कुणी रेल्वेचा कर्मचारी. बर धावत्या रेल्वेतून फोन खाली पडल्यावर नेमकं करायचं काय ह्या प्रश्नाचं उत्तर ना आजीबाईच्या बटव्यात, ना शर्माच्या फिजिक्सच्या पुस्तकात, नाही गुगलकडे. आणि त्या क्षणात करणार काय? बघता बघता गाडी थेट कॅन्डी रेल्वेस्थानकात शिरली.

रेल्वेतून उतरताच आम्ही निर्णय घेतला, परत मागे जाऊन मोबाईल शोधायचा. कारण नायकाला साजेसा महागडा मोबाईल. मोबाईलसोडा पण त्यात महत्वाच्या अनेक गोष्टी होत्या. भारतात परतीच्या विमानांची तिकिटे, कार्यालयीन कामकाजाचे साहित्य, आणि मुख्य म्हणजे श्रीलंकेतल्या प्रवासाची प्रत्येक आठवण, अर्थात सर्व फोटो त्यातच होते. मोबाईल सोडायचा म्हणजे ह्या सर्व गोष्टींवर पाणी सोडून देण्यासारखे होते.

पण मी आणि शशी सर दोघेही इंजिनियर माणसे. जरा शक्कल लढवली. नेमके कॅन्डी शहर सुरु होण्याच्या आधी मोबाईल खाली पडला होता, अन त्या रुळांच्या बाजूबाजूने मुख्य रस्ता होता. आम्ही थेट एक रिक्षा पकडून, तोडक्या मोडक्या इंग्रजीत त्याला त्याच मार्गावर घेऊन गेलो, आणि ज्या ठिकाणी मला आठवत होते की शशी सर धावत आले, त्या ठिकाणी आम्ही पायदळ सुरु केली. रेल्वेच्या बाजूबाजूने झाडाझुडपांत शोधाशोध सुरु केली. रेल्वेचा आकार इतका, त्यात मोबाईल पडताना तो सरळ न पडता दूर फेकला जाईल आणि तो रुळांपासून इतक्या अंतरावर पडला असणार अशी गणिते आखली. सोबतच नेमकं कुठल्या भागात तो मोबाईल पडला असणार ह्याचे क्षेत्र निश्चित केले. सोबतच अधून मधून माझ्या फोन वरून त्या फोनवर रिंग देत राहणे, म्हणजे कुठे असेल तर ऐकू येईल वगैरे समीकरणं आम्ही मांडली. आणि आमचा आपला शोध सुरु झाला. पण त्यात काही यश येताना दिसत नव्हते. मी अनेक शक्यतांचे इमले तयार करून आमच्या नायकाला साथ देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतोच.

आम्हाला असली शोधाशोध करताना पाहून, रेल्वेच्या जवळपास राहणारे काही लोक,ज्यांना इंग्रजी समजलं, शोध मोहिमेत सामील झाले. पण तास दोन तास झाले तरी मोबाईल काही मिळाला नाही. त्या प्रवासात पावसाने अंथरलेली हिरवळ बघताना खूप मजा वाटत होती,  पण त्याच पावसाने अंथरलेली उंच गवताची झालर मात्र त्रासदायक वाटत होती. आपण मतलबी माणसे. दोन तासांचा कार्यकाळ झाला तसा आमच्या उचापतीला बाहेरून पाठींबा देणारे श्रीलंकन पोरं सोरं हळूहळू करून पांगले. थोडंफार इंग्रजी आणि उरलेलं सिंहला भाषेत बोलून झालं.

आम्ही देखील तिथून काढता पाय घेणार, पण तितक्यात एक तमिळ मिश्रित हिंदी बोलणारा पुढे. आम्ही सुद्धा हिंदी बोलतो, ते पाहून त्याला कसला तरी हुरूप आला. त्याने त्याचं वेगळं गणित मांडले, म्हणाला मी शोधून बघतो. आणि झरझर करत थेट त्या गवताच्या झुंडीत हात पाय फिरवायला सुरुवात केली. तिथे साप विंचू असण्याची भीती होती, म्हणून कुणीही त्यात उतरून शोध घेतला नव्हता. पण हा भिडू मात्र त्यातच झेपावला, फूट दर फूट करत त्याने त्या झुडूपांतून बरीच मजल मारली आणि ‘कान्तेन कान्तेन’ म्हणत त्याने मोबाईल शोधून काढला. आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती की हा फोन आणि त्यातले फोटो आम्हाला परत मिळतील. पण एकदाचा फोन मिळाला.

प्रवास - अनुभवांची शिदोरी 2

पण फोन आमच्या हातात देऊन हा बुवा वेगाने निघून जाऊ लागला. त्याला कोण तिथून निघण्याची घाई होती. त्याने केवळ मी अब्दुल, तमिळ आहे इतकीच माहिती दिली. एक फोटो घेऊ दिला. त्याला आम्ही धन्यवाद देत होतो, जमलं तर काहीतरी बक्षीस देखील द्यावं म्हणता, पण तो काही ऐकेना. आणि तो बघता बघता त्या घरांच्या गर्दीत गायब झाला. कसाबसा तो फोन मिळाला होता, आणि नेमका तिथला एक भारतीय तमिळ आज आमच्या कामी आला होता. आणि तो फोन मिळाला म्हणून आमच्या जीवात जीव आला होता. कारण कॅब बुकिंग पासून विमानतळावर प्रवेशासाठी लागणारे तिकीट वगैरे सगळ्याच गोष्टी त्या एका मोबाईल मध्ये होत्या. मुख्य म्हणजे माझा आणि शशी सरांचा परतीचा प्रवास वेगळा असल्यामुळे त्यांना संपर्क करण्यासारखे कुठलेच साधन उरणार नव्हते. एकवेळ भारतात फोन हरवल्यावर तत्काळ दुसरे सिमकार्ड घेऊन काम चालवता येईल, पण परदेशात कुठले आले बदली सिमकार्ड? आमच्या नायकाने श्रीलंकन सिमकार्ड न घेण्याचा निर्णय चांगलाच भोवला असता. पण कसेबसे आम्ही त्यातून सुटलो.

हे सर्व प्रकरण संपवता संपवता अर्धा दिवस उलटून गेला. कॅन्डी शहरात एक छोटेखानी चक्कर टाकून आम्ही परतीचा मार्ग धरला. ह्या निसर्गरम्य प्रवासात बऱ्याच नवीन शिकवणी मिळाल्या. आपण आपल्या आयुष्याचा किती मोठा भाग केवळ एका छोट्याश्या साधनावर अवलंबून ठेवतो ह्याची जाणीव झाली. मोबाईल किती महत्वाचा हे कळून चुकले. त्यात विदेशात गेल्यावर एक साधी चूक किती महागात पडू शकते ही शिकवण होतीच. बघता बघता परदेशी प्रवासाचा एकमेव दिवस संपला होता. आमच्या नायकाने ‘कॅन्डी केवळ नाममात्र आहे, प्रवास अनुभव घेण्यासारखा आहे, बघ आयुष्यभर लक्षात ठेवशील’ अशी सबब दिली होती आणि ती तंतोतंत खरी ठरली. आज ७ जुलै २०१९ रोजी बरोबर एक वर्ष आधीची ही घटना.

लहानपणी शाळेत फळ्यावर, अनुभव हीच ज्ञानाची शिदोरी असा सुविचार लिहिलेला असायचा. नेमकं त्या सुविचाराचा अर्थ त्या दिवशी लक्षात आला. प्रवासांत अनुभव आहेत. काही वाईट आहेत काही चांगले, पण प्रत्येक प्रवास माणसाला नवीन काहीतरी देऊन जातो. माणसाने प्रवास केलेच पाहिजेत. तिथूनच माणूस चारी दिशा चौकस होतो, नवीन काहीतरी करून पाहतो, शिकतो असेच माझे ठाम मत आहे. जो प्रवास करायचा थांबला तो संपला.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.